शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. लसीकरणाच्या या टप्प्यावरही अनेक नागरिकांना लसीबाबत साशंकता दिसून येते. लस घेतल्यावर ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे काही नागरिकांना दिसून आली नाहीत. त्यामुळे लस खरी की खोटी, अशी चर्चाही सुरू झाली; पण कोरोना प्रतिबंधक लसी या परिणामकारकच आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.
जिल्ह्यात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. आतापर्यंत ४५ वर्षांवरील ७३.४८ टक्के, तर १८ ते ४५ वयोगटातील ३९.४१ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे आढळतात. काहींना ही लक्षणे जाणवत नाहीत. त्यातून लसीविषयी साशंकता व्यक्त केली जाते. पण ती निराधार असून, त्यामुळे नागरिकांनी निसंकोचपणे लस घ्यावी, असे आवाहनही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.
चौकट
आतापर्यंतचे लसीकरण
पहिला डोस :- १२७७०१८
दुसरा डोस - ५१८५८७
कोव्हॅक्सिन -१,३६,८९४
कोव्हिशिल्ड - १६,५८,७११
चौकट
कोव्हिशिल्डचा त्रास अधिक
जिल्ह्यात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोनच लसी उपलब्ध आहेत. त्यातही कोव्हिशिल्डच्या सर्वाधिक लसी देण्यात आल्या आहेत. ही लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखीसह काही लक्षणे आढळून येतात. त्यामानाने कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना कमी त्रास जाणवतो.
चौकट
लसीनंतर काहीच झाले नाही
- कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतला. डोस घेण्यापूर्वीच अनेकांनी ताप येईल, असे सांगितले होते, पण काहीच त्रास जाणवला नाही. ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे लसीबाबत कुठली शंका बाळगू नका - मोहन कुंभार
- कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतर मला काहीच त्रास जाणवला नाही. लस घेण्यापूर्वी थोडी भीती होती. लस घेतल्यानंतर थोडी कणकण जाणवली, पण लगेच बरा झालो. त्यामुळे सर्वांनी लसी घ्यावी - बाबासाहेब पाटील
चौकट
त्रास झाला तरच परिणामकारक, असे अजिबात नाही
- कोरोनाच्या दोन्ही लसी परिणामकारक आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती अथवा गैरसमज न बाळगता लस घ्यावी. प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक ताकदीनुसार कमी-जास्त त्रास जाणवतो.
- डाॅ. विवेक पाटील, प्रमुख लसीकरण अधिकारी.