सांगली : भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील (वय ६७, रा. सांगलीवाडी) हे जागीच ठार झाले. ते भारतीय सैन्य दलातून कॅप्टन म्हणून निवृत्त झाले होते.
या अपघातात त्यांचे मित्र सुरेश तातोबा कांबळे (५५, कवठेपिरान, ता. मिरज) हे गंभीर जखमी झाले आहेत. माधवनगर रस्त्यावरील चिंताणीनगर रेल्वे पुलावर मंगळवारी सकाळी नऊ वाजता हा अपघात झाला.ज्ञानेश्वर पाटील भारतीय सैन्य दलातून २० वर्षापूर्वी निवृत्त झाले आहेत. सांगलीत गणपती मंदिरात त्यांनी काही वर्षे सुरक्षारक्षक प्रमुख म्हणून काम केले होते. तीन वर्षापूर्वी त्यांनी हे काम बंद केले होते.
विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याशी त्यांचे जवळीकचे संबंध होते. त्यांचे मित्र सुरेश कांबळे गणपती मंदिरात सुरक्षारक्षक आहेत. विजयसिंहराजे पटवर्धन सोमवारी सांगलीत आले होते. माधवनगर रस्त्यावरील माळबंगल्यावरील निवास्थानात ते मुक्कामी आहेत. त्यांना भेटण्यासाठी पाटील व कांबळे दुचाकीवरुन निघाले होते.
कांबळे दुचाकी चालवित होते, तर पाटील पाठीमागे बसले होते. चिंतामणीनगर पुलावरुन जात असताना माधवनगरहून सांगलीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारीने (क्र. एमएच ०९ ईयू १४३८) विरुद्ध बाजूला घेऊन त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये पाटील व कांबळे दुचाकीसह रस्त्यावर पडले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.मोटारीची धडक एवढी भीषण होती की, पुन्हा मोटार बायपास रस्त्यावर पाटील वाडा हॉटेलजवळ चिंचेच्या झाडावर जाऊन आदळली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या कांबळे यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. पण प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना टिंबर एरियातील खासगी रुग्णालयात हलविले आहे.
अपघाताचे वृत्त समजताच मृत पाटील व कांबळे यांंच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मोटारीच्या चालकास ताब्यात घेतले आहे.बहिणीला सोडलेमोटारीचा चालकाची बहिण कवलापूर (ता. मिरज) येथील वसंतदादा पाटील दंत महाविद्यालयात डॉक्टर आहे. बहिणीला सोडण्यासाठी तो महाविद्यालयात गेला होता. तिला सोडून परत सांगलीत येत असताना हा अपघात झाला.
मोटारीच्या चालक बाजूचे टायरमध्ये काहीच हवा नव्हती. कदाचित टायर फुटले असावे, असा संशय आहे. यातून हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.