सांगली : मुदत संपलेल्या ग्राहकांच्या ठेवींची रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या सांगलीतील भाग्यलक्ष्मी पतसंस्थेच्या १३ संचालकांना तीन वर्षांची कैद व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. यातील दोन संचालकांचे निधन झाले आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच न्यायालयाचे अध्यक्ष ए. व्ही. देशपांडे व सदस्या वर्षा शिंदे यांनी मंगळवारी हा निकाल दिला. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याबद्दल शिक्षा होण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच निकाल आहे. अध्यक्ष जयवंतराव धोंडिराम पाटील, उपाध्यक्ष रंगराव आबाजी पाटील, संचालक पंडितराव लक्ष्मण पाटील, राजेंद्र अर्जुने, राजेंद्र रंगराव भोसले, शिवाजीराव दत्ताजीराव पाटील, सदाशिव दुधाप्पा पाळेकर, अमरदीप जनार्दन कांबळे, तानाजी बंडू चव्हाण, पुरुषोत्तम गणपती बर्गे, विक्रम जयवंतराव पाटील (सर्व रा. सांगली) अशी शिक्षा झालेल्या संचालकांची नावे आहेत. यातील विक्रम पाटील हे अध्यक्ष जयवंतराव पाटील यांचे चिरंजीव आहेत. न्यायालयाने या सर्वांना मंगळवारी दुपारी १२ वाजता दोषी ठरवून दुपारनंतर निकाल देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दुपारी तीन वाजता न्यायालयाने तीन वर्षे कैद, प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा ठोठावली. सांगलीतील प्रशांत भगवान पाटोळे, राजाराम पांडुरंग कोळेकर, भगवान भीमराव पाटोळे या तिघांनी भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेत ठेव ठेवली होती. ठेवीची मुदत संपल्यानंतर हे तिघेही रक्कम परत घेण्यास संस्थेत गेले. त्यावेळी संस्थेने त्यांना रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांनी ग्राहक न्यायालयात संस्थेच्या अध्यक्षासह १३ संचालकांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. १५ जून २००९ रोजी याचा निकाल लागला. संस्थेने तिघांच्या ठेवींची रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. तिघांच्या ठेवींची रक्कम २५ लाखांच्या घरात होती. या आदेशानंतर संचालकांनी त्यांना केवळ प्रत्येकी पाच हजार रुपये दिले. त्यानंतर एक रुपयाही दिला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही, म्हणून या ठेवीदारांनी ग्राहक न्यायालयातच दाद मागितली होती. (प्रतिनिधी) खटल्याची सुनावणी सुरू असताना दोन संचालकांचा मृत्यू झाला आहे. सुहास पाटील व चारुशीला जाधव अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांनाही दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. ४संस्थांनी ठेवी परत न केल्याने शेकडो ठेवीदारांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. निकाल ठेवीदारांच्या बाजूने लागूनही त्यांना संस्थेचे संचालक पैसे देत नाहीत. ४या निकालामुळे संस्थाचालकांना चांगलीच चपराक बसणार आहे. ठेवीदारांतर्फे अॅड. अविनाश कुडाळकर यांनी काम पाहिले.
‘भाग्यलक्ष्मी’च्या ११ संचालकांना कैद
By admin | Published: February 03, 2016 12:37 AM