सांगली : शहरातील स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील स्मारकासमोर पार्किंगमध्ये लावलेल्या मोटारीने अचानक पेट घेतला. मोटारीने पेट घेतल्यानंतर ती न्यूट्रल होत रस्त्यावर विनाचालक धावू लागल्याने तारांबळ उडाली. परंतु समाेरच असलेल्या आयलँडजवळ तिला थांबविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. रविवारी रात्री ११च्या सुमारास हा प्रकार घडला.
सांगलीमध्ये बर्निंग कारचा अजब थरार पाहायला मिळाला आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील स्मारकासमोर अनेक वाहने उभी असतात. रविवारी रात्री प्रदर्शन हॉलसमोर उभ्या असलेल्या मोटारीला अचानक आग लागली. बॅटरीजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज होता. आग लागल्यानंतर याची माहिती तातडीने अग्निशमन दलास देण्यात आली.
अग्निशमन दलाचे पथकही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अचानक ती मोटार रस्त्यावर धावू लागली. तिचा वेग खूपच कमी होता. तरीही मोटारीने रस्ता पार करून समोर असलेल्या आयलॅंडजवळ ती थांबली. तेवढ्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर मोटार न्यूट्रल झाल्याने ती धावल्याचा अंदाज जवानांनी व्यक्त केला. रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या या प्रकाराने काही वेळ सांगलीकरांची धावपळ उडाली होती.