सांगली : सांगली बाजार समितीची मिरज उपनिबंधकांकडे आपत्तीच्या नावाखाली असलेली गाडी अखेर शुक्रवारी परत मिळाली. तब्बल दोन वर्षांनी गाडी मिळाल्यामुळे बाजार समितीच्या सचिवासह संचालकांची गैरसोय दूर झाली आहे.
बाजार समितीचे जत, कवठेमहांकाळ व मिरज या तीन तालुक्याचे कार्यक्षेत्र आहे. दोन वर्षापूर्वी आपत्कालीन परिस्थिती होती, त्यावेळी मिरज उपनिबंधकांनी गाडी वापरायला घेतली होती. मिरजेचे उपनिबंधक बाजार समितीच्या संचालक मंडळावर शासकीय संचालक म्हणून नियुक्त आहेत. मात्र पदाचा गैरवापर करीत असल्याचे काही संचालकांचे म्हणणे होते. सचिव आणि संचालकांसाठी असलेली गाडी नसल्याने गैरसोय होत आहे. याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बाजार समितीकडे दोन चारचाकी गाड्या आहेत. एक सभापतींना तर दुसरी संचालक व सचिवांसाठी आहे. मात्र गेल्या दीड ते दोन वर्षापासून दुसरी गाडी मिरज सहकारी संस्थांचे उपनिबंधक वापरत होते. आपत्कालीन परिस्थितीच्या कालावधीत फिरतीसाठी त्यांनी ती नेली होती. मात्र ही परिस्थिती संपली तरी त्यांनी बाजार समितीला गाडी परत दिली नव्हती. पदाचा गैरवापर करून उपनिबंधक गाडी वापरत असून जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी करण्याची मागणी बाजार समिती संचालकांनी दोन दिवसापूर्वी केली होती. अखेर मिरज उपनिबंधकांकडे असलेली गाडी शुक्रवारी बाजार समितीकडे परत पाठविण्यात आली. त्यामुळे सचिवासह संचालकांना प्रशासकीय कामासाठी गाडी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला.