सांगली : पाल म्हटले की अंगावरचे झुरळ झटकून टाकावे, तशी सर्वसामान्यांची भावना होते, पण हिवतड (ता. आटपाडी) येथील अक्षय अधिकराव खांडेकर या तरुणाने पालीलाच मित्र बनवले. तिच्या वेगवेगळ््या वंशवेलींवर संशोधन करत तब्बल बावीस अज्ञात प्रजाती शोधून काढल्या. अक्षयच्या संशोधनाला जगभरात मान्यता मिळाली आहे. पाली व सरीसृपांच्या क्षेत्रात त्याचा शब्द अखेरचा ठरतो. सांगलीकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.
सत्तावीस वर्षीय अक्षय सध्या बेंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स इन्स्टिट्यूट या संस्थेत कनिष्ठ संशोधक आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि संगणकापलीकडेही करिअरचे क्षेत्र असते, याची फारशी जाण नसल्याच्या काळात अक्षयने सरपटणा-या प्राण्यांवर संशोधनाचे जगावेगळे क्षेत्र निवडले. वन्यजीव संशोधन म्हणजे लष्कराच्या भाकºया भाजण्याचेच काम, त्यातही सरपटणाºया प्राण्यांचे विश्व म्हणजे भटक्यांचे उद्योग.
साप, पाली आणि बेडूक या प्राण्यांबाबतीत तर गैरसमजच अधिक. मात्र त्यांच्यावरील संशोधनालाच जगण्याचे ध्येय बनवून अक्षयने मोलाची कामगिरी बजावली आहे. हिवतडचे किंबहुना सांगली जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशात ठळक केले आहे. वयाची तिशीही अद्याप पार न केलेल्या अक्षयने आजपर्यंत बावीसहून अधिक पाली व सरड्यांच्या नव्या प्रजातींचा शोध लावला आहे.
हिवतडमध्ये १९९३ मध्ये जन्मलेल्या अक्षयचे वडील अधिकराव खांडेकर पेशाने शिक्षक, पण बालमित्रांमुळे अक्षयला जंगलांचा नाद जडला. तो रानवाटांत रमला. सुटीत कावड्याच्या डोंगरावर भटकंती ठरलेली. आठवीनंतर शिक्षणासाठी तासगावला रवानगी झाली. सांगलीतील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात तो बी. एस्सी. भाग दोनपर्यंत शिकला. तेथे प्रा. मिलिंद वडमारे यांनी त्याला पाठबळ दिले. बी. एस्सी.दरम्यान स्वप्नील पवार यांच्याशी संपर्क आला. त्यांनी समृद्ध पश्चिम घाटाचे विश्व खुले करून दिले. त्यांच्याच ओळखीने ज्येष्ठ उभयसृपशास्त्रज्ञ डॉ. वरद गिरींची भेट झाली.
एम. एस्सी.च्या शिक्षणावेळी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स या संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांच्या संपर्कात तो आला. यातील शास्त्रज्ञ डॉ. इशान अग्रवाल त्यांच्यासोबत अक्षय संशोधनाच्या निमित्ताने भारतभर भटकला. या संधीचे सोने करत पाली व सरड्यांच्या नवनव्या प्रजातींचा उलगडा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली
आजवर महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात सरडे व पालींच्या बावीस प्रजाती जगासमोर आणल्या आहेत. गेल्याच आठवड्यात तमिळनाडूमध्ये दोन नव्या प्रजातींची संशोधन पत्रिका प्रसिद्ध झाली आहे.