२१ मिरज फोटो १०
मिरज-सुभाषनगर रस्त्यावरील बेदरकार रिक्षांवर कारवाईसाठी अनुजा कपूर, शभा गाडगीळ, सुनीता जाधव, आदी महिलांनी आमदार सुरेश खाडे यांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मालगाव रस्त्यावरील बेभान वाहनांना रोखण्याची मागणी महिलांनी पोलिसांकडे केली. तसे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर व आमदार सुरेश खाडे यांना दिले.
शिष्टमंडळातील महिलांनी सांगितले की, मालगाव रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक भरमसाट भाडे आकारतात. लॉकडाऊनपूर्वी दहा रुपयांत होणाऱ्या प्रवासासाठी आता २५ रुपये घेतले जात आहेत. शहरी बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचा गैरफायदा उठविला जात आहे. रिक्षा प्रवासीही मोठ्या प्रमाणात भरले जातात. सुसाट वेगाने पळविल्या जातात. यामुळे पादचाऱ्यांचे, तसेच दुचाकीस्वारांचे जीव धोक्यात येत आहेत. विशेषत: महिला दुचाकीस्वारांना रिक्षा चालकांनी धडकी भरविली आहे.
महिलांनी मागणी केली की, पोलीसांनी रिक्षाचालक व मालक यांची बैठक घेऊन सूचना द्याव्यात. भरमसाट भाडे वसूल करणाऱ्यांवर कारवाई करावी. या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी पोलीस नियुक्त करावेत, शिवाय दिंडीवेस ते सुभाषनगरदरम्यान फिरती गस्तही ठेवावी. या भागात लोकवस्ती वाढली आहे. उपनगरेही निर्माण झाली आहेत. कोणतीही अनुचित घटना घडल्यास नागरिकांना शहरातील पोलीस ठाण्याकडे धाव घ्यावी लागते. पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो. याचा विचार करून परिसरात पोलीस चौकी उभारावी.
निवेदन देण्यासाठी भाजपा महिला आघाडी चिटणीस अनुजा कपूर, शोभा गाडगीळ, लतिका शेगणे, दादासाहेब कांबळे, सुनीता जाधव, संगीता घाटगे, आदी उपस्थित होते. वीरकर यांनी मागण्यांची दखल घेऊन योग्य कार्यवाहीची ग्वाही दिली.
चौकट
फिरते पथक नेमण्याची सूचना
शिष्टमंडळाने आमदार सुरेश खाडे यांनाही रिक्षांवर कारवाईसाठी साकडे घातले. मालगाव रस्त्यावर जागा मिळाल्यास पोलीस चौकीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. भरधाव वाहतूक रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने पथक नेमण्याची सूचना वीरकर यांना केली.
--------------