सांगली : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे अधिकाऱ्यांनी घोड्यांवर बसून का केले, याबाबतची चौकशी करण्यात येईल, अशाी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी इस्लामपूर (सांगली) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.ते म्हणाले की, अधिकाऱ्यांना संबंधित शेतमालकानेच घोड्यावरून येण्यास सांगितले होते. ते घोडेही शेतमालकाचेच होते, असे सांगण्यात येत आहे. तरीही अशाप्रकारची गरज अधिकाऱ्यांना का भासली, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे केले, याबाबतची संपूर्ण चौकशी करण्यात येईल. प्रकरणाची तातडीने कारणीमिमांसा होईल. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.बोंडअळीमुळे वैजापूर तालुक्यात कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करून दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले होते. त्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक तैनात केले होते.
अंचलगाव येथे गणेश चोथे यांच्या शेतातील कपाशीचा पंचनामा तलाठी समाधान पैठणे व कृष सहाय्यक पुंडे यांनी चक्क घोड्यावर बसून केला. याचा पुरावा म्हणून घोड्यावर स्वार होऊन पंचनामा करतानाची छायाचित्रेही त्यांनी काढली होती.
नेमकी हीच छायाचित्रे त्यांच्या अडचणीची ठरली आहेत. घोड्यावरून पंचनामा करण्याच्या अजब पद्धतीबद्दल राजकीय टीकाही होऊ लागली आहे. राज्याच्या राजकीय पटलावर हा विषय आता चर्चेत आला असून कृषी विभागाचीही डोकेदुखी यामुळे वाढली आहे.
सदाभाऊ खोत यांनी आता चौकशीचे आदेश दिल्याने याप्रकरणी आता अधिकारी काय खुलासा करणार आणि त्यांच्याबद्दल काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय त्यांनी केलेल्या पंचनाम्याचा अहवाल सादर होणार की पुन्हा पंचनामे केले जाणार हासुद्धा चर्चेचा विषय बनला आहे.