आटपाडी : माडगुळे (ता. आटपाडी) येथे ग. दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर या थोर साहित्यिकांचे स्मारक, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नांबरोबर गारपीटीने नुकसान झालेल्या शेंडगेवाडीसह अन्य ठिकाणच्या गारपीटग्रस्तांना मदत करावी अशी मागणी खानापूर-आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.
राष्ट्रवादीचे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, आनंदराव पाटील, सादिक खाटीक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने जयंत पाटील यांची इस्लामपूर येथे कारखाना, दूध संघ स्थळावर भेट घेऊन ही मागणी केली.
महाराष्ट्र वाल्मीकी ग. दि. माडगूळकर, थोर साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर, प्रा. डॉ. अंबादास माडगूळकर, कथाकार ॲड. नानासाहेब झोडगे आदी महनीयांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या माडगुळे गावी बामणाचा पत्रा, माडगूळकरांचे निवासस्थान संरक्षित करून, माडगूळकर बंधूंचे जागतिक उंची आणि दर्जाचे स्मारक निर्माण करावे, माडगुळे गावी येणाऱ्या देशभरातील साहित्यप्रेमी, माडगूळकरप्रेमींसाठी प्रशस्त २५ सूटचे शासकीय विश्रांतीगृह तयार करावे.
गारपिटीने आटपाडी तालुक्यातल्या काही गावात हानी झाली आहे. शेंडगेवाडी (आटपाडी), बनपुरी, तडवळे, मुढेवाडी, भिंगेवाडी, नांगरेमळा (आटपाडी) या ठिकाणी झालेल्या गारपिटीने नुकसान झाले. शेंडगेवाडीत झालेल्या गारपीट नुकसानीचे पंचनामे केले गेले असून एकूण ६२ शेतकऱ्यांचे ऊस, डाळिंब, मका व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण १७ हेक्टर बाधित क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या गारपिटीने परिसरातील झाडे, पक्षी, कोंबड्या यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्याची मागणी केली.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, दत्ता यमगर, राजेंद्र सावंत, भाऊसाहेब लिंगडे, माडगूळे ग्रामपंचायतीचे सदस्य अमोल विभूते, नितीन लिंगडे, यशवंत खळगे आदी उपस्थित होते.