सांगली : अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्जाची वसुली करून आणखी रक्कम मागणाऱ्या सांगली व सुभाषनगर येथील सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता काका आळगीकर (रा. त्रिकोणी बागेजवळ, सांगली), शब्बीर चाऊस व सोहेल चाऊस (दोघेही रा. सुभाषनगर) अशी संशयित सावकारांची नावे आहेत.
तिघांवर मिरज शहर व मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सावकारांविरोधात उघडलेल्या मोहिमेनुसार ही कारवाई करण्यात आली.
मिरजेतील वखारभाग येथील टेलर व्यावसायिक असलेल्या मल्लाप्पा ऊर्फ सुदीप हुचाप्पा अंदानी यांनी सांगलीतील सावकार दत्ता आळगीकर याच्याकडून एप्रिल ते मे २०१९ या कालावधीत तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या मोबदल्यात आळगीकर दर महिन्याला तीस हजारांचे व्याज घेत होता. व्याजाच्या रकमेने अंदानी हताश झाले होते. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक गेडाम यांची भेट घेत व्यथा मांडली. अधीक्षक गेडाम यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत आळगीकर याच्याविरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या प्रकरणात सुभाषनगर येथील विनोद संगम शिंगे या माळीकाम करणाऱ्या व्यक्तीने चाऊस यांच्याकडून दुचाकी गहाण ठेवून २५ हजारांचे कर्ज मासिक १५ टक्के व्याजाने घेतले होते. व्याजासह सर्व रक्कम देऊनही दोघे सावकार आणखी मागणी करत होते. शिंगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, इस्लामपूर पोलिसांनीही बुधवारी कारवाई करत एका सावकारावर गुन्हा दाखल केला आहे.
चौकट
अडवणूक होत असल्यास तक्रार द्या
सध्या गुन्हा दाखल झालेल्या सावकारांविरोधात किंवा अन्य कोणत्याही सावकाराकडून अडवणूक होत असल्यास त्याची तक्रार करावी. तक्रारीची दखल घेऊन सावकारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पाेलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिला आहे.