कवठेएकंद आणि नागाव (कवठे) येथील येथील ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित नसतात, असा आरोप करून आठवले यांनी शुक्रवारी पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागास कुलूप ठोकून विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आणि शिपायाला कोंडून घातले. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद कक्ष अधिकारी मनोहर कोरडे यांनी दिली आहे. कवठेएकंद आणि नागाव (कवठे) येथील ग्रामसेवक कार्यालयात शासकीय वेळेत हजर नसतात. वैद्यकीय रजेच्या नावाखाली ते इतरत्र फिरत असतात. पंचायत समिती सदस्यांचा फोन उचलत नाहीत, अशी तक्रार करून रजेच्या काळात या गावांना पर्यायी ग्रामसेवक द्या, अशी मागणी आठवले यांनी ग्रामपंचायत विभागाकडे केली होती. मात्र, या विभागाने आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करून त्यांनी शुक्रवारी तीन विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आणि शिपाई अशा पाच जणांना तासभर कोंडून घातले.
त्यानंतर, आठवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कर्मचारी आक्रमक झाले. आठवले यांच्याकडून सातत्याने त्रास होताे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांनी मध्यस्थी करून विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शनिवारी कक्ष अधिकारी कोरडे यांनी आठवले यांच्याविरोधात फिर्याद दिली.