लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून बाणूरगड (ता. खानापूर) येथे बहिर्जी नाईक स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम घेतल्याने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह चाैघांवर विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर व निलेश नेताजी पाटील (रा. खंबाळे-भा.) यांचा समावेश आहे. नायब तहसीलदार चेतन कोनकर यांनी याबाबतची फिर्याद पोलिसांत दिली आहे.
बाणूरगड येथे दि. १९ जुलै रोजी सायंकाळी पर्यटन विकास अंतर्गत बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा परिसर विकास व पर्यटन पायाभूत विकासकामाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन झाले. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह सुमारे १५० ते १७० जण उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या बंदी आदेशाचे उल्लघंन झाले होते. त्यामुळे भारतीय साथरोग अधिनियम १८९७ कलम ११, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ अ प्रमाणे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, त्यांचे बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर (दोघेही रा. पडळकरवाडी, ता. आटपाडी), सरपंच सज्जन बाबर (रा. बाणूरगड) व ठेकेदार निलेश पाटील (रा. खंबाळे-भा.) अशा चार जणांविरूद्ध नायब तहसीलदार चेतन कोनकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.