कुपवाड : शहरातील संजय इंडस्ट्रीजमधील एका विलगीकरण कक्षात काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याला 'तुम्हाला मस्ती आली आहे. तुम्ही राजकारण करता, तुमची बातमी लावून सगळ्यांना दाखवितो', असे म्हणून एका यु ट्यूबच्या पत्रकाराने दमदाटी केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अतिश आवळे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित पत्रकाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माधवनगर मधील संजय इंडस्ट्रीजमधील एका कंपनीत कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात ग्रामविकास अधिकारी उमेश कृष्णा नवाळे व आपत्ती व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शासकीय काम करत होते. मंगळवारी (दि.१) दुपारी संशयित अतिश आवळे हा विलगीकरण कक्षात आला. त्याने नवाळेसह पदाधिकाऱ्यांना 'तुम्हाला मस्ती आली आहे. तुम्ही राजकारण करता', असे म्हणून मोठमोठ्याने आरडाओरडा करून सर्वांना दमदाटी केली.' तुमची बातमी लावून सगळ्यांना दाखवितो'. असे म्हणून संशयित आवळे यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबतची तक्रार ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे यांनी कुपवाड पोलिसांत दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आवळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करत आहेत.