सांगली :
शहरातील गेस्ट हाऊस समोर असलेल्या एका हॉटेलजवळ दुचाकीची डिक्कीतून सव्वा चार लाखांची रोकड चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी रतनलाल रामकिसन सारडा यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी रतनलाल सारडा यांचे मार्केट यार्डत आडत दुकान आहे. ते आपल्या कुटुंबियांसह नेमीनाथनगर मध्ये राहण्यास आहेत. त्यांनी बँकेतून आठ लाख रुपये काढले होते. त्यापैकी ४ लाख ३० हजारांची रोकड त्यांनी गाडीच्या डिकीत ठेवली होती. चोरट्यांनी पाळत ठेवून मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीची डिकीचे लॉक तोडत रोकड लंपास केली. चोरीचा प्रकार निदर्शनास येताच सारडा यांनी पोलिसात तक्रार दिली. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास सुरू केल्याचे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.