सांगली : येथील हरभट रस्त्यावरील लॉजमध्ये उतरलेल्या अमरावती येथील अजय मोहन निर्मळ (वय ३७) या सेल्समनची पावणेतीन लाखांची रोकड व चार धनादेश चोरट्यांनी लंपास केले. गुरुवारी (दि. २१) सायंकाळी पावणेसात वाजता ही घटना घडली. चोरट्यांनी निर्मळ यांची बॅॅग बनावट चावीने उघडून ही रोकड पळविली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय निर्मळ हे एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. चार दिवसांपूर्वी ते सांगलीत वसुलीसाठी आले होते. हरभट रस्त्यावरील हॉटेल आदर्शमध्ये ते राहिले होते. कंपनीची वसूल झालेली दोन लाख ७८ हजार ८३0 ची रोकड त्यांनी बॅगेमध्ये ठेवली होती. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता ते शौचालयास गेले होते. त्यानंतर ते दहा मिनिटांत परत आले. रात्री उशिरा त्यांनी कामानिमित्त बॅग उघडली. त्यावेळी बॅगेतील रोकड व चार धनादेश नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी लॉज व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली; पण याबद्दल कोणाला काहीच माहिती नव्हती. त्यानंतर शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी लॉजमधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली; पण काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे शनिवारी निर्मळ यांची फिर्याद घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी झाली कशी ? बॅगेची चावी निर्मळ यांच्याकडेच होती. चोरट्यांनी बॅगेचे लॉक तोडलेले नव्हते. त्यामुळे चोरी कशी झाली? असा प्रश्न पडला होता. कदाचित चोरट्यांनी बनावट चावीचा वापर केला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. केवळ दहा मिनिटांतच ही चोरी झाली आहे, असा दावा निर्मळ यांनी केल्याने याचा छडा लावणे पोलिसांना आव्हान बनले आहे.
सांगलीत पावणेतीन लाखांची रोकड लंपास
By admin | Published: April 24, 2016 12:11 AM