हणमंत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, मिरज: स्वप्न दाखवणारा नेता जनतेला आवडत असतो; मात्र स्वप्न पूर्ण न करणाऱ्या नेत्याला जनता उखडूनसुद्धा टाकते. जे नेते आपल्या कर्तृत्वावर निवडून येऊ शकत नाहीत तेच जात आणि धर्माच्या नावावर राजकारण करतात, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
भाजप उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ मिरजेत संवाद मेळावा पार पडला. यावेळी गडकरी म्हणाले की, इंधन व विजेऐवजी हायड्रोजनचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. पेट्रोल पंपाप्रमाणे हायड्रोजन स्टेशन रस्त्यावर उपलब्ध असतील. विकसित भारतात जल, जमीन व जंगल याच्या आधारावर अर्थव्यवस्थेचा विचार करून शेतकऱ्याला समृद्ध केले जात आहे.
काँग्रेसचे आर्थिक धोरण भंगारात गेले. विकासाचे कुठलेही व्हिजन काँग्रेसकडे नव्हते. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले. कॉंग्रेसच्या काळात जलसिंचनाच्या योजना रखडल्या होत्या. रस्त्यांची कामे होत नव्हती. या परिस्थितीत २०१४ला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर जलसिंचन, रस्ते व पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. जलसिंचन योजना गतीने राबविल्यामुळे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात हरितक्रांती झाली. सगळीकडे पाणी पोहोचले. मी जलसंपदा मंत्री असताना बळीराजा संजीवन योजनेतून नऊ हजार कोटी आणि प्रधानमंत्री कृषी संजीवन योजनेतून ११ हजार कोटी रुपये जलसिंचनाकरिता दिल्याने लाखो एकर जमीन पाण्याखाली आली. जिल्ह्यात जत, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर या तालुक्यांत जलसिंचन योजनांमुळे आमूलाग्र बदल झाला.
गडकरी म्हणाले, गरिबी दूर करणारा, सामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करणारा, गरिबांचे कल्याण करणारा भाजप व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू व्हायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. विसाव्या शतकात अमेरिका सुपर पॉवर झाला. २१वे शतक भारताचे आहे. शेती उद्योग, निर्यात यावर भर दिल्याने २५ कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुरेश खाडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री दीपक शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार रमेश शेंडगे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, माजी महापौर सुरेश पाटील आदी उपस्थित होते.