विकास शहा -शिराळा तालुक्यात यावर्षी भीषण दुष्काळजन्य परिस्थिती आहे, मात्र पाण्याचे नियोजन करणाऱ्या पंचायत समिती, छोटे पाटबंधारे विभागात कर्मचारी, अधिकारी यांची कमतरता, यामुळे दुष्काळाचे नियोजन कसे होणार? कूपनलिका दुरुस्त करणाऱ्या युनिटच्या गाडीला चालक व मेकॅनिकही नाही. सध्या या विभागाच्या जीपचे चालकच कूपनलिका दुरुस्तीची कामे करीत आहेत.यावर्षी तालुक्यात पन्नास टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, पिके यांची भीषण परिस्थिती आहे. आणखी दोन महिन्यातच मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईस तोंड द्यावे लागणार आहे. मात्र याचे नियोजन, देखरेख, पाहणी, आराखडा तयार करणे याची मोठी जबाबदारी छोटे पाटबंधारे विभागाकडे आहे. मात्र या कार्यालयाकडे असणारी महत्त्वाची पदे रिक्त आहेत.या कार्यालयाचे उपअभियंता पद गेली १५ वर्षे ‘प्रभारी’ आहे. सध्या या ठिकाणी प्रतिभा शेरकर या काम पाहत आहेत. तसेच पाच शाखा अभियंता पदे असताना, फक्त एकच जागा भरली आहे. चार पदे रिक्त आहेत. अनुरेखक पदही रिक्त आहे. एक महिला अधिकारी व एक अभियंता तालुक्यात कोठे कोठे पाहणी करणार, नियोजन करणार, शासकीय बैठकांना उपस्थित राहणार आणि प्रत्यक्ष काम कधी करणार? हा प्रश्न आहे.याहीपेक्षा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, तालुक्यात ५३२ कूपनलिका आहेत. त्यांची देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या विभागाच्या गाडीला चालक नाही, की दुरुस्ती करणारा मेकॅनिकही नाही. फक्त ‘कूपनलिका दुरुस्ती युनिट’ कागदावर आहे. त्यामुळे कूपनलिका दुरुस्ती नी त्याची वेळोवेळी निगा राखणे अवघड झाले आहे. सध्या छोटे पाटबंधारे विभागाच्या जीपचे चालक आर. डी. साळुंखे हेच या कूपनलिकांची दुरुस्ती करण्याचे काम करीत आहेत. म्हणजे संपूर्ण तालुक्याचे ‘पाणी नियोजन, दुरुस्ती’चे काम हे तिघे अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. या रिक्त जागा भरण्याबाबत वारंवार कळवूनही या गंभीर बाबीकडे वरिष्ठ कानाडोळा करीत आहेत. वरिष्ठांना याचे गांभीर्यच नसावे असे वाटते.उपअभियंता प्रभारी : यंत्रणाही जुनाटया विभागाचे चार शाखा अभियंता तसेच मुख्य उपअभियंता पद रिक्त.या विभागाकडे असणारी जीप ३५ वर्षांपूर्वीची आहे.५२३ कूपनलिकांची दुरुती-देखभाल जीपचे चालक करीत आहेत.कूपनलिका दुरुस्ती युनिट फक्त कागदावरच. ना गाडीला चालक, ना कूपनलिका दुरुस्ती करणारा मेकॅनिक.
‘छोटे पाटबंधारे’च्या यंत्रणेची वाताहत
By admin | Published: November 08, 2015 11:07 PM