सांगली : शिराळा तालुक्यातील नाटोली येथे शेतजमीनीचा सर्व्हे नंबर व सातबारामधील चूक दुरूस्त करण्यासाठी दोन हजारांची लाच स्विकाराताना तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले. भगवानसिंग व्यंकटसिंग रजपूत (वय ३०) असे तलाठ्याचे नाव असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
नाटोली (ता. शिराळा) येथे तक्रारदाराच्या वडीलांच्या नावे शेतजमीन आहे. या शेतजमीनीचा सर्व्हे नंबर व सातबारातील चूकीची दुरूस्तासाठी अर्ज केला होता. यावेळी सातबारातील चूक दुरूस्त करून उतारा देण्यासाठी तलाठी रजपूत याने ५ हजारांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली होती. याची पडताळणी केली असता, तलाठी रजपूत याने प्रथम ५ हजारांची मागणी चर्चेअंती ४ हजार रूपये लाचेची मागणी करत त्यातील २ हजार रूपये घेऊन येण्यास सांगितले होते.
त्यानुसार नाटोली तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला होता. त्यावेळी तक्रारदाराकडून २ हजारांची लाच स्विकारताना तलाठी रजपूत यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर शिराळा पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलीस निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले यांच्यासह अविनाश सागर, रविंद्र धुमाळ, संजय कलकुटगी,संजय संकपाळ, राधिका माने, सीमा माने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.