उमदी : जालिहाळ बुद्रुक (ता. जत) येथे शेतजमिनीच्या वादातून दोघा पुतण्यांनी सख्ख्या चुलत्याचे अपहरण करून त्याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. महादेव कन्नापा पुजारी (वय ५७, सध्या रा. कुसुर, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर, मूळ जालिहाळ बुद्रुक) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सिलिशिध्द भुताळी पुजारी (३०) व प्रभुलिंग ओग्याप्पा पुजारी (२१) यांना उमदी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना गुरुवारी जत न्यायालयात हजर केले असता, दि. १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
जालिहाळ बुद्रुक येथील महादेव पुजारी यांचा शेतजमिनीवरून पुतणे सिलिशिध्द पुजारी व प्रभुलिंग पुजारी यांच्याशी वाद होता. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून ते सोलापूर जिल्'ातील कुसुर येथे राहत होते. त्यांच्या जमिनीच्या वादाचा खटलाही जत न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्यात अनेकवेळा वादातून मारहाण होऊन पोलिसात गुन्हेही दाखल आहेत.
महादेव पुजारी हे २८ नोव्हेंबर रोजी न्यायालयात खटल्याच्या कामासाठी आले होते. त्याचदिवशी जालिहाळ बुद्रुक येथे ते आईलाही भेटायला आले होते. त्यावेळी सिलिशिध्द व प्रभुलिंग यांनी त्यांना स्वत:च्या दुचाकीवर जबरदस्तीने बसवून नेले. त्यानंतर ते बेपत्ताच होते. याबाबत त्यांची पत्नी भागीरथी यांनी उमदी पोलिसात महादेव यांच्या अपहरणाची तक्रार दि. ३ डिसेंबर रोजी दिली होती. त्यानुसार उमदी पोलिसांनी बुधवार दि. ४ रोजी संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी खून केल्याची कबुली दिली.
सिलिशिध्द व प्रभुलिंग यांनी महादेव पुजारी यांना लवंगा रस्त्यावरील मरीआई मंदिराच्या आवारातील आपल्या शेतात नेऊन, त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना ठार केले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात घालून गावाच्या शेजारी असलेल्या आनंदा पाटील यांच्या ओढापात्रातील विहिरीत दगड बांधून टाकल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत भागीरथी महादेव पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमदी पोलिसात आरोपी सिलिशिध्द पुजारी व प्रभुलिंग पुजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही आरोपींना अटक करून जत न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.आईची भेट...मृत महादेव पुजारी हे आईला भेटण्यासाठी आले होते. हीच संधी साधून त्यांच्या पुतण्यांनी त्यांचा घात केला. आईची भेट घेण्यास आलेल्या महादेव यांचा अशा पद्धतीने घात झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.