शेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रम फाऊंडेशन व दत्त सहकारी पतसंस्थेच्या वतीने उमदी व डफळापूर येथे कोविड रुग्णालय सुरू करणार असल्याची माहिती आमदार विक्रम सावंत यांनी दिली.
आमदार सावंत यांनी उमदी येथे कोविड रुग्णालयासाठी जागेची पाहणी केली. तसेच उमदी येथील स्थानिक डॉक्टरांची बैठक घेतली. यावेळी विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम, रोहन चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, डॉ. हत्तळ्ळी, डॉ. मदगोंड, डॉ. लोणी, डॉ. हिरेमठ आदी उपस्थित होते. आमदार सावंत म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता विक्रम फाऊंडेशनच्या वतीने उमदी येथे ४० ऑक्सिजनयुक्त बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा मानस आहे. सर्व औषधोपचार, डॉक्टरांना आवश्यक असणारे पीपीई कीट, मास शिल्ड, आदी सर्व उपाययोजना या ठिकाणी होणार आहेत. रुग्णांना चहा व नाष्टा या सोयी उपलब्ध होतील. माणुसकीच्या दृष्टिकोनातून उमदी येथील सर्व डॉक्टरांनी संभाव्य रुग्णावर उपचार करावेत. यावेळी उपस्थित डॉक्टरांनीही रुग्णांवर उपचार करण्याची ग्वाही दिली.
विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम म्हणाले की, विक्रम फाऊंडेशनने नेहमीच सामाजिक बांधीलकी जपली आहे. आमदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी येथे कोविड रुग्णालय उभे करणार असून, येथील डॉक्टरांनी रुग्णसेवा करण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. याबद्दल त्यांचे आभार मानतो.