राज्य शासनाने दि. २३ मार्च रोजी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोविडचा समावेश केल्यानंतर राज्यातील सर्व पात्र गरीब रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. गेले वर्षभर कोविड साथीमुळे व लॉकडाऊनमुळे शेतकरी, छोटे व्यापारी, व्यावसायिक, औद्योगिक, खासगी कर्मचारी, फेरीवाले, रिक्षाचालक, कामगार या सर्वांची आर्थिक स्थिती बिकट आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी गरीब रुग्ण आर्थिकदृष्ट्या अगतिक आहेत. रुग्णांना दिलासा देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोविडचा समावेश केला आहे. मात्र सध्या ज्या रुग्णालयात ही योजना राबविली जात आहे. तेथे प्रतिरुग्ण एक लाख ते सव्वालाख बिल आकारणी होत असून, यापैकी योजनेच्या लाभार्थीला केवळ वीस हजार रुपये सवलत मिळत आहे. उर्वरित रकमेसाठी रुग्णांचे हाल होत असल्याने महात्मा फुले योजनेतून सर्व उपचारखर्च करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व खासगी कोविड रुग्णालयात ही योजना प्रभावीपणे राबवून महात्मा फुले योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. राज्य शासनाच्या घोषणेप्रमाणे या योजनेतील सर्व लाभार्थींना मोफत व योग्य उपचारांची व्यवस्था करावी. ऑक्सिजन टंचाईमुळे कोविड रुग्णाचे जीव धोक्यात असल्याने मिरजेतील कोविड रुग्णालयांना तातडीने ऑक्सिजन पुरवठा करावा अन्यथा आंदोलन करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, नगरसेवक गणेश माळी, निरंजन आवटी, मोहन वाटवे, ईश्वर जनवाडे, सुमेध ठाणेदार, अश्विन कोरे उपस्थित होते.