सांगली : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने टाकलेला छापा म्हणजे राजकीय षड्यंत्र आहे. केंद्रातील सत्ताधारी तपास यंत्रणेचा गैरवापर करीत आहेत, अशी टीका कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले की, सीबीआय ही मोठी संस्था आहे. त्यांचा वापर राजकीय गोष्टींसाठी करणे हे लोकशाहीला मारक आहे. या यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची बाब आता लपलेली नाही. देशमुख यांच्याबाबत जे काही प्रकार सुरू आहेत, त्या चुकीचे आहेत. सत्य काय आहे ते बाहेर येईल. या यंत्रणांचेही सत्य लोकांसमोर निश्चितपणे येईल. केंद्रातील सरकारने या यंत्रणांचा गैरवापर थांबवावा.
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील परिस्थिती समजून घेऊन योग्य ती मदत केली पाहिजे. ही टीका करण्याची वेळ नाही. त्यामुळे आम्ही टीका करण्यापेक्षा केंद्र शासनाकडे मदत मागत आहोत. त्यांनी ती करावी. जनतेला या संकटातून बाहेर काढणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे.
रुग्णालयांच्या फायर ऑडिटबाबत ते म्हणाले की, निश्चितपणे फायर ऑडिट झाले पाहिजे. रुग्णांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळेच शासनाने याबाबतचे आदेशही तातडीने काढले आहेत. राज्यातीलच नव्हे तर देशातील अनेक शासकीय रुग्णालयांच्या इमारती या ४० ते ५० वर्षे जुन्या आहेत. त्यांच्यात गरजेनुसार बदल करण्यात आले. मोठ्या प्रमाणात आवश्यक बदल केले पाहिजेत. त्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे.