लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज अदा करीत बकरी ईद साजरी केली. येथील ईदगार मैदानावर केवळ पाच जणांनी नमाज पठण करीत प्रशासनाला सहकार्य केले. कोरोनातून लवकरच मुक्ती मिळावी, अशी प्रार्थना मुस्लिम बांधवांनी केली.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी सहकार्याची भूमिका घेत कुठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली. इदगाह मैदानावर कोरोना नियमांचे पालन करीत पाच सदस्यांनी नमाज अदा केली. यावेळी कमिटीचे अध्यक्ष मुन्ना कुरणे, हाफिज सद्दाम सय्यद, फारुखभाई शेख, इमाम मुजावर, इस्लाईल शेख उपस्थित होते. ईदगाह मैदानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता. अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, निरीक्षक अजय सिंदकर यांनी ईदगाहला भेट दिली.
कडक निर्बंधांमुळे सामूहिक नमाज पठण करण्यास बंदी आहे. त्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी घरातून नमाज अदा केली. हिंदू-मुस्लिम बांधवांनी सोशल मीडियातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांनी कोरोना नियम व अटीचे पालन करीत प्रशासनाला सहकार्य केले.