लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भगवान महावीर यांची जयंती रविवार, दि. २५ एप्रिल रोजी आहे. दरवर्षीप्रमाणे मिरवणूक अथवा जाहीर कार्यक्रम घेण्यात येणार नाहीत. यामुळे समाजबांधवांनी घरामध्येच महावीर जयंती साजरी करावी, असे आवाहन दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केले आहे.
ते म्हणाले की, सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे गतवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवान महावीर यांची जयंती स्थानिक पातळीवर मंदिरांमध्ये आणि वैयक्तिक स्तरावर घराघरांतून साजरी करावी. मंदिरांमध्ये सकाळी पंचामृत अभिषेकादी विधी मंदिराचे स्थानिक पंडितांनी करावा. सायंकाळी आरती करावी. श्रावक-श्राविकांनी घरी मूर्ती असल्यास सकाळी अभिषेक, अष्टक करावे, मूर्ती नसल्यास भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन, अष्टक करावे. सायंकाळी दारात पाच दीपक लावावेत, आरती करावी.