सांगली : शहरासह जिल्ह्यात रविवारी मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी नागराजाच्या मूर्तीचे सुहासिनींनी विधिवत पूजन केले. दिवसभर सुरू असलेला श्रावणसरींचा खेळ आणि त्याच्या जोडीला आलेल्या सुटीमुळे रविवारी पारंपरिक उत्साहात नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला. सकाळपासून शहरातील नाग मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दुपारनंतर शहरातील विविध उपनगरांत महिलांनी फुगड्यांचा फेर धरत आणि झोपाळ्याचा आनंद लुटत नागपंचमीचा आनंद द्विगुणित केला. नागपंचमीच्या निमित्ताने शहरातील मंदिरांसमोर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नागपंचमीच्या निमित्ताने शहरातील माळी गल्ली, सराफ बाजार परिसरातील, हिराबाग चौकाजवळील मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी नागदेवतेचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल यांची रेलचेल होती. झाडाला बांधलेल्या झोपाळ्याचा आनंद लुटण्यासाठी महिलांची चढाओढ लागली होती. सायंकाळीही मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती. शहरातील विविध उपनगरात कुंभार बांधवांनी केलेल्या मातीच्या नागाच्या प्रतिकृतींना मोठी मागणी होती. सुमारे ३० हजाराहून अधिक नागमूर्ती यानिमित्ताने विकल्या गेल्याचा अंदाज कुंभार बांधवांनी व्यक्त केला. वारूळ पूजनासाठीही महिलांनी गर्दी केली होती. नागपंचमीच्या निमित्ताने शांतिनिकेतनमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वंदना शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत नाग प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तासगाव : शहरासह परिसरात रविवारी मोठ्या उत्साहात नागपंचमी पार पडली. विविध ठिकाणी नागराजाच्या मूर्तीचे सुहासिनींनी विधिवत पूजन केले. नागपंचमीच्या निमित्ताने नाभिक समाज बांधवांनी व्यवसाय बंद ठेवले होते. नागपंचमीनिमित्त मानकरी असलेल्या नाभिक समाजबांधवांनी तासगाव शहरात नागराज गल्लीत नागराजांच्या मूर्तीची स्थापना केली. नाभिक समाजातील कृष्णा गायकवाड, सुदाम खंडागळे, नंदू गायकवाड, मोहन खंडागळे, महादेव खंडागळे, प्रशांत खंडागळे, नीलेश गायकवाड, गोरख गायकवाड, निखिल गायकवाड, पवन गायकवाड, स्वप्निल गायकवाड यांनी सहभाग घेतला. शहरातील सोमवार पेठ, दाणे गल्ली, गणपती मंदिर चौक येथे मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पूजनासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात नागपंचमी उत्साहात साजरी
By admin | Published: August 07, 2016 11:07 PM