कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचा सांगलीत जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी
By अविनाश कोळी | Published: May 13, 2023 03:10 PM2023-05-13T15:10:12+5:302023-05-13T15:11:23+5:30
महागाईला, जाती-धर्माच्या वाईट राजकारणाला कर्नाटकच्या जनतेने योग्य उत्तर दिले
सांगली : कर्नाटकातील भाजपची सत्ता उलथवून काँग्रेसने मिळविलेल्या विजयाचा उत्सव सांगलीतकाँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी साजरा केला. ढोल-ताशा वाजवत, घोषणा देत त्यांनी आनंद व्यक्त केला. सांगलीच्या काँग्रेस भवनासमोर शनिवारी दुपारी काँग्रेसच्या शहरातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. काँग्रेसचा ध्वज हाती घेत, ढोलवादन करीत, विजयाच्या घोषणा देत कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, देशातील हुकूमशाही सरकारला, त्यांनी वाढविलेल्या महागाईला, जाती-धर्माच्या वाईट राजकारणाला कर्नाटकच्या जनतेने योग्य उत्तर दिले आहे. संपूर्ण निवडणुकीत काँग्रेसने जातीय तेढ निर्माण होईल, असेच राजकारण केले. दुसरीकडे काँग्रेसने लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडत, त्यांच्याशी सुसंवाद साधत निवडणुकीत यश मिळवले. कर्नाटकचा हा कौल आगामी लोकसभा निवडणुकीतही दिसेल. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचाही हा परिणाम आहे.
आनंदोत्सवात यावेळी मयुर पाटील, शशिकांत नागे, बिपीन कदम, अमर निंबाळकर, पैगंबर शेख, तौफिक शिकलगार आदी सहभागी झाले होते.