लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील तिन्ही गटांतील सहकार पॅनलच्या उमेदवारांनी विजयश्री खेचून आणल्यानंतर समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करून गुलालाच्या उधळणीत मिरवणुका काढल्या.
बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटात सहकार पॅनलचे विजयी उमेदवार संजय पाटील (इस्लामपूर), जितेंद्र पाटील (बोरगाव), जे. डी. मोरे (रेठरे हरणाक्ष), अविनाश खरात (खरातवाडी), जयश्री पाटील (बहे) विजयी झाले. नेर्ले -तांबवे गटात सहकार पॅनलचे संभाजी पाटील (नेर्ले), लिंबाजी पाटील (तांबवे), इंदुमती जाखले (नेर्ले), तर येडेमच्छिंद्र वांगी गटात शिवाजी पाटील (येडेमच्छिंद्र), बाबासाहेब शिंदे (देवराष्ट्रे) विजयी झाल्यनंतर समर्थकांनी आपापल्या गावात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून मिरवणूक काढली.
इस्लामपूर येथे संजय पाटील यांच्या समर्थकांनी उरुण परिसरात मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी करत आष्टा नाक्यावरील राजारामबापू पुतळ्यास अभिवादन केले. बोरगाव येथे जितेंद्र पाटील यांचे वडील एल. के. पाटील यांचे नुकतेच निधन झाल्याने तेथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला नाही. जे. डी. मोरे यांच्या समर्थकांनी रेठरे हरणाक्ष येथे फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. अविनाश खरात यांनी खरातवाडी येथे गुलालाची उधळण केली. बहे येथे जयश्री पाटील यांनीही विजयोत्सव साजरा केला. येडेमच्छिंद्र आणि देवराष्ट्रे येथे सहकार पॅनलचे शिवाजी पाटील आणि बाबासाहेब शिंदे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून मिरवणूक काढली.
चौकट
कौल मान्य
इस्लामपूर येथे संस्थापक पॅनलचे उमेदवार शिवाजी पवार आणि रयत पॅनलचे आनंदराव मलगुंडे यांनी सभासदांचा कौल मान्य करत धनशक्तीमुळे पराभव झाल्याचे सांगितले. मनोमिलनचे गुऱ्हाळ लांबत गेल्याने प्रचाराला वेळ मिळाला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.