कडेगाव : स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने प्रत्येक तालुकास्तरावर आरोग्यमेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी व दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार संजय पाटील यांनी केले. आरोग्य मेळाव्यातून व शिबारातून सर्वसामान्य रुग्णांना फायदा होतो. या आरोग्य मेळाव्यातील लाभार्थीना आयुष्यमान भारत योजना अंतर्गत ‘हेल्थ कार्ड’ देऊन या कार्डधारकांना नामांकित रुग्णालयात मोफत उपचार घेता येणार आहेत. नागरिकांनी या आरोग्य मेळाव्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही खासदार पाटील यांनी केले.स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त केंद्र सरकारतर्फे सुरू असलेल्या 'आझादी का अमृत महोत्सव' कार्यक्रमामार्फत चिंचणी (वांगी) ग्रामीण रुग्णालयात आयोजित आरोग्य मेळाव्याचे आज, गुरुवारी खासदार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मोहनराव कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, चिंचणीच्या सरपंच मनीषा माने आदी उपस्थित होते.यावेळी आमदार मोहन कदम यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत चिंचणी ग्रामीण रुग्णालय हे ग्रामपंचायत स्तरावरील राज्यातील पहिले ग्रामीण रुग्णालय असल्याचे सांगितले व येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.संग्रामसिंह देशमुख म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वारंवार आरोग्य शिबिरे घेतली, ‘दिव्यांग मित्र’ अभियान राबवले. जिल्ह्यात तब्बल ३४ हजार २६५ दिव्यांगांची नोंदणी झालेले हे अभियान राज्यासाठी ‘मॉडेल’ बनले. त्याप्रमाणे या आरोग्य मेळाव्यातूनही सर्व सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणार आहेत.दरम्यान, कोरोना योद्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध - खासदार संजय पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 4:21 PM