सांगली : चंडीगढ-यशवंतपूर व यशवंतपूर-निजामुद्दीन संपर्क क्रांतीला सांगली व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा देण्यास मध्य रेल्वेने पुन्हा नकार दिला आहे. त्यामुळे सांगली नागरिक जागृती मंचने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. नागरिक जागृती मंचने याप्रश्नी सांगली व किर्लोस्करवाडीत संपर्क क्रांतीला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला आहे.मंचचे प्रमुख सतीश साखळकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या १८ वर्षांपासून मध्य रेल्वेच्या पुणे व मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चंडीगढ-यशवंतपूर संपर्क क्रांती व यशवंतपूर-निजामुदीन संपर्क क्रांतीला सांगली व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा देण्यास अनेक वेळा नाकार दिला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे सांगली व किर्लोस्करवाडीला संपर्क क्रांतीचा थांबा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर रेल्वे बोर्डने सांगली व किर्लोस्करवाडीत थांबा देण्याचे आदेश दिले होते. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ते धुडकावून लावले. रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्डाचा आदेशही मध्य रेल्वेचे अधिकारी मानत नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे.सांगली जिल्हातील लोकांचा अठरा वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक जागृती मंचने शेवटची लढाई सुरू करण्याचा इशारा दिला आहे. मंचने याबाबत पंतप्रधानांकडे तक्रार केली असून मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून असे प्रकार वारंवार होत असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.
स्थानकावर आंदोलन करण्याचा इशारानरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही जर संपर्क क्रांतीला सांगली व किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबा दिला नाही तर सांगली व किर्लोस्करवाडी स्थानकावर जोरदार आंदोलन करुन काळे झेंडे दाखवून संपर्क क्रांती रोखू, असा इशारा दिला आहे.