सांगली : मध्य रेल्वेतर्फे राज्यातील १७ स्थानकांवर सुसज्ज मालधक्के उभारण्यात येत आहेत. त्यामध्ये आरग रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी ही माहिती दिली. मुंबई मुख्यालयात वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापकांच्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते. संबोधित केले.
परिषदेला परिचालन, कोचिंग, नियोजन आणि मालवाहतूक विभागाचे प्रमुख उपस्थित होते. तसेच मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर विभागांचे परिचालन विभाग प्रमुख उपस्थित होते. लालवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार या मालधक्क्यांवर वाहतूक, प्रकाश व्यवस्था, जोडणारे रस्ते, हमाल व कर्मचाऱ्यांसाठी सुविधायुक्त खोल्या आदींची सज्जता केली जाणार आहे. कळंबोली, कसबे सुकेणे, बोरगाव, खामगाव, सावदा, बुरहानपूर, नांदगावताडाळी, बल्लारशाह, कलमेश्वर, मरामझिरी, नीरा, लोणी, विलाद, अहमदनगर, बेलापूर, दौंड आणि सांगली जिल्ह्यातील आरग स्थानकात सुसज्ज मालधक्के तयार होतील. लालवाणी यांनी सांगितले की, सन २०२२-२३ मध्ये ८१.८८ दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली. सन २०२३-२४ ९०.०५ दशलक्ष टनाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये सर्वाधिक वाहतूक कोळशाची होईल. त्याशिवाय सिमेंट, खते, साखर, औद्योगिक उत्पादने आदींचीही वाहतूक केली जाईल. सोलापूर विभागात आरग, कवठेमहांकाळ हे महत्वाचे मालधक्के आहेत. शिवाय पुणे विभागात सांगली, मिरज व कोल्हापूर येथेही वर्षाकाठी कोट्यवधींची मालवाहतूक होते.
आरगमध्ये साखर वाहतूक जोमात
आरग रेल्वे स्थानकातील मालधक्क्यावरुन साखरेची वाहतूक सध्या जोमात आहे. उगार शुगर व आरग येथील मोहनराव शिंदे साखर कारखान्याच्या साखरेची वाहतूक येथून होते. कवठेमहांकाळमधूनही साखरेची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. थेट दक्षिण व पूर्व भारतात साखर पाठवली जाते. त्यामुळे आरग स्थानकातील मालधक्क्याच्या विस्ताराचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.