सांगली : केंद्र शासनामार्फत पाण्याच्या दुर्भिक्ष असणाऱ्या जिल्ह्यामध्ये जलसंधारणाचे कार्य करण्याच्या अनुषंगाने जलशक्ती अभियान केंद्र शासनाच्या संलग्नतेने राबविण्यात येत आहे. हे अभियान 2 टप्प्यामध्ये राबविण्यात येणार असून पहिला टप्पा 1 जुलै 2019 ते 15 सप्टेंबर 2019 व दुसरा टप्पा 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
या योजनेसाठी सांगली जिल्ह्यातून कवठेमहांकाळ तालुक्याची निवड झाली असून या अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची केंद्रीय पथकाकडून पहाणी करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी यांनी दिली.जलशक्ती अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये (1 जुलै 2019 ते 15 सप्टेंबर 2019 ) मध्ये चालू असलेल्या कामांची तपासणी करणेसाठी केंद्र शासनाकडील सह सचिव, उपसचिव, व तांत्रिक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून पथक हे चालू असलेल्या कामांची दर 15 दिवसांनी 3 वेळा पहाणी करणार आहेत.
त्या अनुषंगाने व्दितीय तपासणीसाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे उपसचिव राजू वैद्य व जलशक्ती अभियान मंत्रालय तांत्रिक अधिकारी हनमंतआप्पा हे दि.28/08/2019 ते 31/08/2019 पर्यंत दौऱ्यावर आले होते. त्यामध्ये त्यांनी तालुकास्तरीय सर्व अधिकारी, कर्मचारी यांची आढावा बैठक घेऊन सांगली जिल्ह्यातील आराखड्याबाबतची माहिती घेतली व आवश्यक त्या सूचना यंत्रणेला दिल्या. अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी यांनी दिली.महिला बचतगट यांची बैठक घेवून यामध्ये सहभागी होण्याबाबत आवाहन केले. या अभियानाअंतर्गत चालू असलेल्या कामांची तपासणी कुकटोळी, अलकुड एम, हरोली, आगळगाव, रायवाडी, विठुरायाचीवाडी, खरसिंग, बोरगाव, मळणगाव, नागज या ठिकाणी शोषखड्डा, वृक्षलागवड, छतावर पडणारे पावसाच्या पाण्याचा संचय, पाझर तलाव, समतल चर इत्यादी कामांची पाहणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.
तसेच अलकुड एम मध्ये कृषी विज्ञान केंद्र तर्फे आयोजित केलेल्या मेळाव्यात जास्तीत जास्त शेतक-यांना जलशक्ती कामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर योजनेमध्ये सांगली जिल्हा हा देशामध्ये प्रथम क्रमांकावर आणण्याबाबत सर्व विभाग/ यंत्रणानी प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांच्याकडून देण्यात आल्या.या अभियानामध्ये सिमेंट बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती, वृक्ष लागवड, सलग समतल चर, सिमेंट बंधारे दुरुस्ती, नवीन शेततळी बांधणे, शेततळी दुरुस्ती, नाला, ओढ्यामधील गाळ काढणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, शोष खड्डे, विहीर पुनर्भरण, बोअर वेल पुनर्भरण, माती नाला बांध इत्यादी प्रकारची कामे घेण्यात येणार आहेत व सदर अभियानामध्ये तालुका कृषी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, नगरपालिका, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, जीएसडीए इत्यादी विभागांचा समावेश असून या यंत्रणामार्फत कामे चालू आहेत.