सांगली : महापालिकेकडून कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा सांगली दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाकडून आढावा घेण्यात आला. यावेळी पथकातील सदस्यांनी महापालिकेच्या विजयनगर आरोग्य केंद्राचीही पाहणी करीत लसीकरण प्रक्रियेची माहिती घेतली.
या पथकात मिनिस्ट्री ऑफ हेल्थ वेल्फेअर दिल्लीचे डॉ. प्रणील कांबळे, ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन नागपूरचे असोसिएट प्रोफेसर आणि छाती रोग तज्ज्ञ डॉ. सत्यजित साहू, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांचा समावेश आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, सहायक आयुक्त पराग कोडगुले आणि डॉ. वैभव पाटील यांनी महापालिका क्षेत्रात आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या कोरोना नियंत्रण उपाययोजनांची माहिती दिली. तसेच महापालिकेकडील सद्य:स्थितीत असणारी यंत्रणा, सीसीसी, कोविड हेल्थ सेंटर, ऑक्सिजन उपलब्धता, लसीकरण प्रक्रिया तसेच तिसऱ्या लाटेसाठी सज्ज असणाऱ्या यंत्रणेची सविस्तर माहिती या पथकाच्या सदस्यांना दिली.