मिरज : केंद्रीय जल आयोगातर्फे कृष्णा नदीच्या पुरावर लक्ष ठेवण्यात येत आहे. मिरजेजवळ अर्जुनवाड येथे जल आयोगाच्या केंद्रामार्फत एडीसीपी (ॲकॉस्टिक डॉपलर करंट प्रोफाईलर) या उपकरणाद्वारे दर तासाला कृष्णा नदीपात्रात पाण्याचा प्रतिसेकंद प्रवाह, पाण्याची खोली मोजण्यात येत आहे.कृष्णा नदीला उपनद्या मिळतात तेथे कऱ्हाड नांद्रे, तेरवाड, कुरुंदवाड सदलगा येथे पाण्याची खोली व प्रवाहाचे मोजमाप करून संभाव्य पुरावर लक्ष ठेवण्यात येत आहे. पाण्याची पातळी, प्रवाहानुसार कोयना व अलमट्टी धरणातील साठा व विसर्ग यासाठी जल आयोगाकडून समन्वयाचे काम करण्यात येते. मिरजेत कृष्णा घाटालगत कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ हद्दीत अर्जुनवाड येथे केंद्रीय जल आयोगाचे केंद्र असून, येथून २४ तास नदीपात्रातील पाणी पातळीचे मोजमाप करण्यात येत आहे.जल आयोगातर्फे अत्याधुनिक एडीसीपी या मशीनद्वारे पावसाळ्यात जून ते सप्टेंबरपर्यंत प्रतिसेकंद पाण्याचा प्रवाह, पाण्याची खोली मोजण्यात येत आहे. मिरजेत सध्या २९ मीटर पाणी पातळी असून, धोका पातळी ५७ फुटांवर आहे. मिरजेतून प्रति सेकंद ११०० क्युसेक वेगाने पाणी शिरोळच्या दिशेने प्रवाहित आहे. कोयना धरणातून अद्याप मोठा विसर्ग सुरू नसल्याने पाणीपातळी अद्याप धोकादायक नसल्याचे सांगण्यात आले.पुराचा धोका टाळण्यासाठी आयोगाचे कर्मचारी सक्रिय असून, अत्याधुनिक उपकरणांद्वारे केंद्रीय जल आयोगातर्फे अर्जुनवाड ते अलमट्टी धरणापर्यंत कृष्ण नदीचे सर्वेक्षण व पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पाणीपातळी व प्रवाह वाढल्यास आवश्यकतेनुसार धरणातून विसर्ग सुरू करण्याच्या व विसर्ग थांबविण्याच्या सूचना आयोगाकडून संबंधित राज्यांच्या पाटबंधारे विभागांना देण्यात येतात.
Sangli: कृष्णा नदीच्या पुरावर केंद्रीय जल आयोगाचे लक्ष; एडीसीपी उपकरणाद्वारे नदीपातळी, प्रवाहाचे मोजमाप
By संतोष भिसे | Published: July 20, 2024 4:33 PM