मिरज : मिरजेत गांधी चौक पोलिसांनी लातूर येथून गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन महिलांसह चाैघांना मिरज रेल्वे स्थानक परिसरात अटक केली. त्यांच्याकडून २ लाख रुपये किमतीचा २१ किलो गांजा व ४ लाख रुपये किमतीची मोटार असा सहा लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
गांजा विक्रीसाठी आलेल्या संजय तात्याराव ससाणे (वय ४३, रा. बालाजीनगर, लातूर), महादेव विश्वनाथराव शिंदे (वय ५६, रा. हमाल गल्ली, लातूर), रंजना नामदेव कदम (वय ३६, रा. सुंदराईनगर, परभणी), रुक्मिणी महादेव जाधव (वय ३४, रा. बालाजीनगर, लातूर) या चाैघांना अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ७ हजार रुपये किमतीचा २० किलो ७०० ग्रॅम गांजा व ४ लाख रुपये किमतीची (एमएच १३ एझेड ३८०८) मोटार व रोख रक्कम असा एकूण ६ लाख ११ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.
परभणी लातूर येथील काही जण मिरजेत रेल्वेस्थानकाजवळ रॉकेल डेपो झोपडपट्टीत गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक फाैजदार सुभाष पाटील, हवालदार रावसाहेब सुतार, अमर मोहिते, अमोल ऐदाळे, चंद्रकांत गायकवाड, रिचर्ड स्वामी, अमोल आवळे, गणेश कोळेकर, कोमल धुमाळ, अदिती पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत गांधी चाैक पोलिसांत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी मिरजेत एकाला विक्रीसाठी गांजा देत असल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने चारही आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे करीत आहेत.
चाैकट
लग्नकार्याचा बनाव
मोटारीच्या डिकीत लपवून आरोपींनी मराठवाड्यातून मिरजेपर्यंत गांजा आणला होता. पोलिसांनी मोटारीची तपासणी करू नये यासाठी सोबत महिलांना घेतले होते. लग्नकार्यासाठी सहकुटुंब जात असल्याचा बनाव करून आरोपींनी मोटारीतून गांजा आणल्याचे निष्पन्न झाले.