--------
नांद्रे येथे महिलेचे मंगळसूत्र लांबविले
सांगली : नांद्रे (ता. मिरज) येथे भर दिवसा मोटारसायलवरून आलेल्या चोरट्याने महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना रविवारी घडली. याबाबत प्रणिता उमेश पाटील (३८) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पाटील या रविवारी दुपारी दोनच्या सुमारास नांद्रे- शिरगाव रस्त्यावरील शेतात गेल्या होत्या. जेवणानंतर हात धुऊन परत येत असताना चिंचवाडे मळ्याजवळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून चोरण्याचा प्रयत्न केला. यात मंगळसूत्राचा काही भाग तुटून पडला. उर्वरित मंगळसूत्र घेऊन चोरट्याने पलायन केले.
---------
ऊस मजूर पुरवठ्यातून आठ लाखांची फसवणूक
सांगली : ऊसतोडीसाठी मजूर पुरवठा करण्याच्या नावाखाली नांद्रे (ता. मिरज) येथील एकाची ७ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत हेमंत बाळासाहेब पाटील (वय ३४) याने सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोपट वसंत सातपुते व वसंत शंकर सातपुते (दोघे रा. गौरवाडी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत पाटील यांनी सातपुते याच्याशी सप्टेंबर २०२० मध्ये राजारामबापू साखर कारखाना यांचे गाळप हंगामासाठी मजूर पुरविण्याचा लेखी करार केला होता. त्या बदल्यात पाटील याने वेळोवेळी ७ लाख ८० हजार रुपयांची रक्कम सातपुतेंना दिली. हंगाम संपला तरी त्या दोघांनी मजूर पुरवठा केलेला नाही. तसेच पैसेही परत न केल्याने पाटील यांनी दोघांवर फसवणुकीची तक्रार पोलिसांत दिली.