कोकरुड : राज्य सरकारने बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केल्याने नोकरी, व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी असलेले अनेकजण पुन्हा गावी परतू लागले आहेत. यामुळे शिराळा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.
गेल्यावर्षी आलेल्या कोरोना संकटानंतर गेल्या चार महिन्यात परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने १४ एप्रिल ते १ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीचा नोकरी, व्यवसायावर परिणाम झाल्याने मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह परराज्यात नोकरी, व्यवसायानिमित्ताने गेलेले शिराळा तालुक्यातील ग्रामस्थ आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत.
सध्या ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असतानाच पुन्हा परगावाहून येणाऱ्या नागरिकांमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यातील गाव, वाडी-वस्तीवर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या या नागरिकांची संख्या वाढल्याने ग्रामस्थ, ग्रामपंचायत, ग्राम सुरक्षा समिती, आरोग्य विभाग यांची जबाबदारी वाढली आहे. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
चाैकट
हजारोंच्या संख्येत नागरिक दाखल
गेल्या तीन दिवसात चारचाकी, मालवाहतूक गाडी, खासगी बस यासह विविध प्रकारच्या वाहनांमधून शिराळा तालुक्यात पाच हजारपेक्षा जास्त नागरिक गावी आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यात दररोजच वाढ होत असल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.