शिराळा : शेतकऱ्यांच्या प्राेत्साहन अनुदानासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी महार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.शिराळा येथील लकी मंगल कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बुधवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेट्टी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पाेपट माेरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.शेट्टी म्हणाले, सरकारने अडीच वर्षांपूर्वी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान घोषित केले आहे. परंतु, अद्याप त्याची कार्यवाही झालेली नाही. १३ ऑगस्ट रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या प्रश्नावर कोल्हापूरमध्ये आंदोलन केले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटची बैठक घेऊन शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे मान्य केले होते.तेव्हापासून तीनवेळा कॅबिनेटची बैठक झाली. परंतु, अजूनही सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करणार आहे.महेश खराडे म्हणाले, २००८ व २०१६ या कालावधीतील थकीत शेतकऱ्यांची कर्ज माफी केली. परंतु, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे सरकारने कोणताही निकष न लावता नियमित शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान वर्ग करावे. पुढील काळात एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे. आगामी निवडणुकीसाठी गाफील न राहता कामाला लागा.पोपट मोरे म्हणाले, सध्या मजुरी, खते, बी-बियाणे, वाहतूक खर्च वाढल्याने शेतकरी तोट्यात आहे. म्हणूनच राजू शेट्टी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, अशी मागणी वारंवार करत आहेत. शासनाचे कोणतेही धोरण शेतकऱ्यांच्या उपयोगाचे नाही.यावेळी उपाध्यक्ष राम पाटील, संपर्कप्रमुख सुधीर संदे यांनीही मार्गदर्शन केले. शिराळा तालुक्यातील‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पन्नास हजार रुपयांचा निधी यावेळी दिला. या मेळाव्याला रवी दुकाने, तानाजी साठे, शिवलिंग शेटे, रवींद्र पाटील, रवींद्र धस, तालुकाध्यक्ष मानसिंग पाटील, नाथाभाऊ निकम, हेमंत मुळीक, लता गायकवाड उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानावरुन राजू शेट्टी आक्रमक, 'क्रांती दिनी' करणार महार्गावर 'चक्का जाम आंदोलन'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 1:24 PM