सांगली : मालवाहतुकीमध्ये जबरदस्तीने वसूल केल्या जाणाऱ्या वाराईविरोधात दंड थोपटण्याचा निर्णय वाहतूकदार संघटनेच्या बैठकीत झाला. सांगली, शिरोळ, सातारा, कराड, कोल्हापूर, वाठार येथील सर्व वाहतूकदार संघटनांची बैठक रविवारी सांगलीत झाली. यावेळी मोठ्या संख्येने वाहतूक व्यावसायिक उपस्थित होते.मालवाहतूक क्षेत्रातील समस्या, ओव्हरलोड, भाड्याचे दर, भ्रष्टाचार आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली. या समस्या सोडविण्यासाठी तिन्ही जिल्ह्यांतील संघटनांनी एकत्र येण्याचा निर्णय झाला. कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव म्हणाले, ज्याचा माल, त्याचा हमाल धोरण राबवावे, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही. सांगलीचे बाळासाहेब कलशेट्टी म्हणाले, वाराईविरोधातील कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी.दरम्यान, वाराईविरोधात प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत चक्का जाम करण्याचा इशारा संघटनेने दिला. धरणे आंदोलनही करण्याचे ठरले.
बैठकीचे संयोजन सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केले. ट्रक, टेम्पो, बस, टँकर महासंघाचे माजी अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी पुढील लढाईसाठी एकजुटीचे आवाहन केले. ऑल इंडिया मोटार काँग्रेसचे कार्यकारी संचालक बाळासाहेब कलशेट्टी यांनी सांघिक लढ्याची रूपरेषा स्पष्ट केली. स्वाभिमान एकता मालवाहतूक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव चिंचकर ताकदीने लढा देण्याचे आवाहन केले.