अशोक डोंबाळेसांगली : सांगलीबाजार समितीच्या ३७ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. पण, माजी संचालकांनी या ठेवींचा मनमानी पद्धतीने खर्च करुन बाजार समितीची तिजोरी कंगाल केल्यामुळे नूतन संचालकांसमोर कारभार करण्याचे मोठे आव्हान आहे. उत्पन्न वाढविण्यासह भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि गुळ, बेदाणा, हळदीची उलाढाल ५० टक्क्यांनी घटली असून त्याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.बाजार समितीच्या माजी संचालकांवर एकाही नेत्याचा अंकुश नसल्यामुळे त्यांनी मनमानी पद्धतीने कारभार करुन नामांकित बाजार समितीला कलंकीत केले. कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार करुन ३७ कोटी रुपयांच्या ठेवींचा चुराडा केला. या निधीतून केलेले एकही काम दर्जेदार झाले नाही. बाजार समितीच्या हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य दिल्यामुळे बाजार समिती सध्या आर्थिक संकटात आली आहे.
नूतन संचालकांनी मागील संचालकांच्या चुकांची दुरुस्ती करुन स्वच्छ कारभार करण्याची गरज आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर अंकुश ठेवून शेतकरी, व्यापाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले तरच सांगली मार्केट यार्डाचा विकास होणार आहे. गुळ, बेदाणा, हळदीची ५० टक्के उलाढाल कमी होऊन ती जिल्ह्याबाहेर जात आहे. यामध्ये नक्की त्रुटी काय आहेत, याचाही व्यापारी व शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याची गरज आहे.
हे प्रश्न सोडविण्याची गरज
- विष्णूअण्णा फळ मार्केटला अद्यावत शीतगृहाची गरज
- मार्केट यार्डातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करावे
- सात वर्षात व्यापार वाढीसाठी प्रयत्न झाले नाहीत. सध्या तातडीने व्यापार वाढीसाठी व्यापाऱ्यांची बैठक घ्यावी
- बाजार समितीच्या मालकीची गोडावन गरजेची
- केंद्र शासनाकडून बेदाणा नियमनात आणण्यांची गरज
- शेतकऱ्यांसाठी बाजार समितीत सुविधांचा वानवा
- मार्केट यार्डामध्ये गटारी करण्याची गरज
- वाढत्या चाेऱ्यामुळे मार्केट यार्डातील व्यापारी अस्वस्थ
पार्किंगचा प्रश्न कोण सोडविणार?महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यातून शेतमालासह अन्नधान्य घेऊन रोज शेकडो वाहने मार्केट यार्डात येतात. या वाहनांसाठी पार्किंगची सुविधाही बाजार समिती प्रशासनाने केली नाही. संचालक आणि नेत्यांनाही कधी हा प्रश्न सोडवावा, असे वाटले नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी नूतन संचालकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
अभ्यासू सभापती, उपसभापतींची गरज
बाजार समितीमध्ये येणे, म्हणजे पैसे कमविणे या भूमिकेतून संचालकांनी बाहेर येण्याची गरज आहे. तसेच निष्कलंक, स्वच्छ प्रतिमेच्या संचालकास सभापती, उपसभापती म्हणून संधी देण्याची गरज आहे. तरच कंगाल सांगली बाजार समिती वाचविण्यास त्यांची मदत होणार आहे.