दिलीप मोहिते
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा शहरातील नागरिकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेने कार्यरत केलेल्या घोगाव नळपाणी पुरवठा योजनेमुळे पालिकेला दर वर्षी १ कोटी ११ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. या योजनेवर वर्षाला जवळपास ४ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च होत असून, पाणीपट्टीच्या रूपाने पालिकेच्या तिजोरीत ३ कोटी ५९ लाख रुपये येत आहेत. त्यामुळे नगरपालिकेला वर्षाला एक कोटी अकरा लाख रुपये अन्य करांच्या उत्पन्नातून घालून ही योजना चालू ठेवावी लागत आहे. त्यामुळे घोगाव पाणी योजनेचा पांढरा हत्ती पोसण्याचे मोठे आव्हान नगरपालिकेसमोर उभा राहिले आहे.
विटा शहराला घोगाव येथील कृष्णा नदीतून प्रतिदिन ९० लाख लिटर पाणी उचलावे लागते. ते पाणी आळसंद जलशुद्धिकरण केंद्राच्या माध्यमातून शुद्ध केले जाते. यासाठी सुमारे १ हजार १०० अश्वशक्तीचे पंप कार्यान्वित केले आहेत. प्रतिमहिना साडेतीन ते चार लाख युनिट विजेचा वापर होत आहे. वर्षाला सव्वा तीन कोटी रुपये वीज बिलावर खर्च होत आहेत. शहरात १० हजार ५०० नळ कनेक्शन आहेत. त्यामुळे पाणीपट्टीच्या माध्यमातून ३ कोटी ५९ लाख रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळते. परंतु, घोगाव पाणी योजनेचा वार्षिक खर्च ४ कोटी ७० लाख रुपये आहे. त्यामुळे नगरपालिकेला वर्षाला १ कोटी ११ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
चौकट :
पाणी योजनेचे विस्तारीकरण
सध्या विटा शहराच्या पाणीपुरवठा करण्यासाठी विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. सुमारे ३३ ते ३४ कोटी रुपयांच्या निधीतून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लेंगरे रस्त्यावरील शिवमल्हार डोंगर पायथ्याजवळ १२ लाख लिटरची पाणी टाकी बांधण्यात येत आहे. या टाकीतून सायपन पद्धतीने कऱ्हाड रोड, घुमटमाळ व गांधीनगर येथील प्रत्येकी ३ लाख ५० हजार लिटर टाकीत, तसेच जुन्या टाकीत पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र, हे सर्व केले तरी पाणी योजनेच्या एकूण उत्पन्नापैकी ७० टक्के रक्कम वीज बिलावर खर्च झाली तर नगरपालिकेला दरवर्षीचा सव्वा कोटीचा तोटा ठरलेलाच आहे.