विटा : खानापूर तालुक्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून, मंगळवारी विटा शहरासह तालुक्यात २०७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, प्रशासनाची दमछाक झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने मंगळवारी तालुक्यातील भाग्यनगर, वलखड माहुली व घानवड या चार गावांत भेट देऊन ६ कंटेन्मेंट झोन तयार केले, तर होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना घराबाहेर न पडण्याच्या सक्त सूचना केल्या.
विटा शहरास खानापूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विटा व तालुक्यात असलेल्या कोविड रुग्णालयात सध्या बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकांना उपचार घेणे जिकिरीचे झाले आहे. शासनाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली आहे. त्यामुळे ११ वाजेपर्यंत कोणत्याही नियमाचे पालन न करता भाजी मंडईसह अन्य ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आणणे मुश्कील झाले आहे. परिणामी रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रशासनासह आरोग्य विभागही चांगलाच हादरून गेला आहे.
मंगळवारी विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोराेनाचे नवीन २०७ रुग्ण आढळून आले. सध्या ८९१ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने दररोज प्रबोधन केले जात असले तरी लोकांची गर्दी कमी होत नाही. त्यामुळे विटा शहरासह तालुक्यात कमीत कमी ७ दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर करण्याची मागणी नागरिकांतून वाढू लागली आहे.
दरम्यान, मंगळवारी प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांच्यासह पथकाने भाग्यनगर, माहुली, वलखड, घानवड आदी चार गावांत भेटी दिल्या. त्यावेळी स्थानिक ग्राम दक्षता समितीशी चर्चा करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची व शासनाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रशासनाने भाग्यनगर येथे १, माहुली येथे ३ व वलखड येथे २ असे ६ कंटेन्मेंट झोन तयार केले. तसेच होम आयशोलेशनमध्ये असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना योग्य त्या सूचना दिल्या.
फोटो : २७ विटा २..३..४
ओळ : खानापूर तालुक्यातील माहुली येथे प्रांताधिकारी संतोष भोर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्यासह प्रशासनाने भेट देऊन पाहणी केली.
फोटो कॅप्शन ०३ : खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, भाग्यनगर आदी गावात प्रशासनाने कंटेन्मेंट झोन तयार केले आहेत.