सांगली : जिल्ह्यातील बारा सहकारी आणि चार खासगी साखर कारखान्यांनी पाच महिन्यांत ७२ लाख ६७ हजार ४८ टन उसाचे गाळप करून ८९ लाख ५९ हजार ९४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. गळीत हंगामाच्या सुरुवातीस साखरेला दर नसल्याने बहुतांशी कारखान्यांनी साखर विक्री थांबविली होती. यंदाही जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात साखर उत्पादित झाल्यामुळे शिल्लक साखरेचा साठा कोठे ठेवायचा, असा प्रश्न कारखानदारांसमोर आहे. किरकोळ बाजारपेठेत साखरेचे दर तेजीत असले, तरी व्यापार्यांकडून चांगला दर मिळत नसल्याचा आरोप कारखानदार करत आहेत. आॅक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ पर्यंत साखरेचे दर गडगडलेलेच होते. मार्च २०१४ मध्ये २७०० रुपये क्विंटलवरून २८०० ते २९५० रुपयांपर्यंत दर पोहोचले. एप्रिल महिन्यात तर ३००० ते ३१०० रुपये क्विंटल दर होता, पण तो दर साखर कारखानदारांच्या पदरात पडलाच नाही. कारखानदारांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतांशी जुनी साखर विक्री करून बँकांची देणी काहीप्रमाणात भागविली. कारखानदारांकडून साखरेची विक्री झाल्यानंतर व्यापार्यांनी अचानक साखरेचे दर वाढविले. मग निविदा काढून साखर विक्री करेपर्यंत मे २०१४ च्या पहिल्या आठवड्यापासून शंभर ते दीडशे रुपयांनी दर उतरले. साखर दरातील चढ-उताराच्या धोरणामुळे कारखानदारी अडचणीत आल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यातील बारा सहकारी आणि चार खासगी अशा सोळा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. हंगाम उशिरा सुरू होऊनही ७२ लाख ६७ हजार ४८ टन उसाचे गाळप करून ८९ लाख ५९ हजार ९४५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. शिल्लक साखर मिळेल त्या दराने विक्री केली आहे. परंतु, काही कारखान्यांनी उशिरापर्यंत साखर ठेवली होती. या कारखान्यांसमोर सध्या उत्पादित साखर कोठे ठेवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कडेगाव येथील केन अॅग्रो साखर कारखान्याने तात्पुरते गोदाम उभारून तेथे साखरेचा साठा केला होता; पण वादळी वार्यासह झालेल्या पावसात ती साखर भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले. केन अॅग्रोप्रमाणेच जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनीही तात्पुरत्या स्वरूपाची गोदामे तयार केली आहेत. त्यांना वादळाचा तडाखा बसलेला नाही; पण धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यातच भरीस भर म्हणून सध्या साखरेचे दरही उतरल्यामुळे साखर कारखानदारांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
८९ लाख क्विंटल साखर उत्पादन विक्रीसह साठवणुकीचे आव्हान : जिल्ह्यातील कारखान्यांच्या हंगामाची सांगता
By admin | Published: May 10, 2014 11:46 PM