अशोक पाटीलइस्लामपूर : राजकीय वातावरण जोपर्यंत स्थिर होते, तोपर्यंत इस्लामपूर, शिराळा मतदारसंघातील ज्येष्ठ नेते व त्यांच्या वारसदारांच्या वाटा सुरळीत वाटत होत्या. राज्यातील राजकारण अस्थिर व बदलाच्या लाटेवर स्वार झाल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. दुसरीकडे त्यांचे वारसदार राजकीय अस्तित्वाच्या प्रश्नाने अस्वस्थ झाले आहेत. तिसऱ्या फळीतील युवा नेत्यांची अवस्थाही वेगळी नाही.इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक यांनी राजकारण, सहकार, उद्योग, शिक्षण क्षेत्रातील ताकद भक्कम केली. याच ताकदीवर त्यांनी राजकीय वारसदार निश्चित केले आहेत.
इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्या अपरोक्ष प्रतीक पाटील जबाबदारी पेलत आहेत. शिराळा मतदारसंघात मानसिंगराव नाईक यांचे राजकीय वारसदार विराज नाईक आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्याने युवा नेत्यांच्या राजकीय हालचाली थंडावल्या.राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचे राजकीय वारसदार रणधीर नाईक राजकारणात बस्तान बसविण्यात व्यस्त असताना राष्ट्रवादीच्या फुटीने ते शांत झाले आहेत. आमदार जयंत पाटील, शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक हे तिन्ही नेते शरद पवार यांचे नेतृत्व मानत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भाजप आणि अजित पवार गटाचा दबाव असल्याचे बोलले जाते.माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुत्र सागर खोत यांचा थेट मिनी मंत्रालयात जाण्याचा मार्ग खुला केला होता. परंतु, आमदार पाटील यांच्या समर्थकांनी तो हाणून पाडला. सध्या खोत यांचा राजकीय प्रवास भाजपच्या छत्रछायेखाली संथ गतीने सुरू आहे.माजीमंत्री आण्णासाहेब डांगे यांचा राष्ट्रवादीत वेगळा ठसा होता. त्यांचे पुत्र ॲड. चिमण डांगे आणि विश्वास डांगे यांनी त्यांच्या गटाचे अस्तित्व टिकवले आहे. परंतु, अण्णासाहेब डांगे यांची कोल्हापूर येथील सभेतील उपस्थिती आमदार पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली. यावर सध्यातरी त्यांच्या वारसदारांनी मौन पाळले आहे.
माझ्या मतदारसंघातील कासेगाव, केदारवाडी, पेठनाका येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यांचा सत्कार करू शकलो असतो. परंतु, आपण शरद पवार यांच्या पाठीशी ठाम आहोत. मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे, विकासकामे, उद्योगाच्या माध्यमातून युवकांच्या हाताला रोजगार देणे हीच आमची दिनचर्या आहे. - आमदार मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी.