शरद जाधव ।सांगली : आजवर ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा धोका आपल्यात केवळ चर्चिला जात असे. आता मात्र हा धोका आपल्या उंबरठ्यावर आला आहे. सध्या पर्यावरण, हवा, पाणी, वातावरण बदल, जैवविविधता हे विषय अत्यंत महत्त्वाचे झाले आहेत. पण दुर्दैवाने त्यावर कोणीही गांभीर्याने विचार करताना दिसत नाही.
जिल्ह्यातील आटपाडी, जत तालुक्यातील फोंड्या माळावरील ते गर्द चांदोली क्षेत्रातील जैवविविधता अभ्यासकांना खुणावत असली तरी, वाढत्या प्रदूषणामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे.जागतिक जैवविविधता दिनानिमित्त जिल्ह्यातील विविधतेचा आढावा घेतला असता, इतर निसर्गसंपन्न भागाइतकीच किंबहुना त्याहून अधिक जैवविविधता सांगली जिल्ह्यात आढळून येते. सांगली जिल्ह्याची भौगोलिक रचनाच आव्हानात्मक आहे.
आटपाडी तालुक्यातील झरे ते मिरज तालुक्यातील अंकली आणि जत तालुक्यातील उमदी ते चांदोली असा उभा आडवा पसरलेला आपला जिल्हा. जिल्ह्याचा पूर्व भाग टंचाई अनुभवत असला तरी, त्या भागातही वेगळी जैवविविधता आढळते. अभ्यासकांच्या मते, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील डोंगराळ भागात सापडणारे विंचू, छोटे कीटक आपले वेगळेपण जपून आहेत. अगदी या भागातील सरडाही वेगळी ओळख दर्शवितो. दुसरीकडे हिरवाईने नटलेल्या दुसऱ्या भागातही जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही जैवविविधता टिकविण्याचे आव्हान आता सर्वांसमोर निर्माण झाले आहे.जलचरांची संख्या घटतेयजिल्ह्यात कोल्हा, सायाळ, लांडगा, तरस, साळिंदर या प्राण्यांपासून ते रानमांजर, गवा, वाघही आढळतात. केवळ पशू, पक्षी, प्राण्यांच्यातच नव्हे, तर वनस्पतींमध्येही विविधता आढळते. जिल्ह्याच्या पूर्व भागात कोल्हा, लांडगा, तर चांदोली अभयारण्यातील विविधता तर जगभरातील पर्यटकांना खुणावत आहे. जिल्ह्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संथ वाहणारी कृष्णामाई आणि विविध पाणी योजना. या नदीमध्ये अनेक दुर्मिळ जलचर, मगरी, मासे आढळत असले तरी, आता नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळे त्यांची संख्याही वेगाने कमी होत आहे.+परदेशी पक्ष्यांचे आगमनजिल्ह्याच्या जैवविविधतेत भर घालण्यासाठी लाखो किलोमीटरचा प्रवास करून परदेशी पक्षी जिल्ह्यात येत असतात. पक्षीप्रेमींशिवाय या पक्ष्यांना पाहण्यासाठी दुर्दैवाने कोणीही जात नाहीत. कृष्णा नदीचा तीर असो अथवा मोठ्या साठवण क्षमतेचे तलाव, यावर हे परदेशी पक्षी हमखास दिसून येतात.
जिल्ह्यात अभिमान वाटेल इतकी संपन्न जैवविविधता आहे. परंतु, त्याची पाहणी करण्याची तसदीही घेतली जात नाही. चांदोलीमधील जैवविविधता तर जागतिक दर्जाची आहे. अशीच विविधता सर्वच भागात आढळून येते. केवळ शासनाच्या भरवशावर न राहता, प्रत्येक नागरिकाने कर्तव्य म्हणून ही जैवविविधता टिकविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.- अजित (पापा) पाटील, ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक