अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या ‘करेक्ट कार्यक्रमा’ला आव्हान देण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील सरसावले आहेत. सोमवार, दि. २९ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीला भगदाड पाडून पाटील यांचाच कार्यक्रम करण्याचा डाव खोत यांनी आखला आहे, तर हा डाव उधळून लावण्यासाठी आ. पाटील प्रतिडाव आखत आहेत. यासाठी खा. राजू शेट्टी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नवी खेळी खेळण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.वाळवा आणि शिराळा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला निवडणुकीत मतदान प्रतिनिधी मिळणे दुरापास्त होते, परंतु खासदार राजू शेट्टी यांना ऊस उत्पादक आणि राष्ट्रवादी-काँग्रेसविरोधातील पक्षांनी मदत करून दोनवेळा निवडून दिले आहे. संघटनेची ताकद वाढल्याने सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाले. आता शेट्टी व खोत यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. याचा फायदा जयंतरावांनी घेतला आहे. एका बाजूला खोत यांना लक्ष्य करताना दुसरीकडे खासदार शेट्टी यांच्या आत्मक्लेश पदयात्रेची प्रशंसा करून, संघटनेचे कार्यकर्ते शेट्टींच्याच बाजूने राहतील, अशी गुगली टाकली आहे.खा. शेट्टी यांची आत्मक्लेश पदयात्रा ३0 मे रोजी राजभवनावर संपणार आहे. त्याअगोदरच शह देण्यासाठी खोत यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इस्लामपूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. याच मेळाव्यात राष्ट्रवादीतील मातब्बर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना शह देण्यासाठी आ. पाटील यांनी शेट्टींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास : गर्दी करण्याचा प्रयत्नस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बहुतांशी कार्यकर्ते राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शेतकरी मेळाव्यास गर्दी होण्यासाठी स्वत: सागर खोत बागणी जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावात जाऊन, लोकांना मेळाव्यास येण्याची विनंती करत आहेत.आधी त्यांना पाठवा!नगराध्यक्ष निशिकांत पाटील विकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्याकडे भाजप प्रवेशाबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत या ज्येष्ठ नेत्याने आधी मंत्री खोत यांना भाजपमध्ये घालवा, नंतरच तुम्ही प्रवेशाचे बघा, असे सांगितल्याचे समजते.
सदाभाऊंचे जयंतरावांच्या करेक्ट कार्यक्रमास आव्हान
By admin | Published: May 25, 2017 11:20 PM