नाशिक : पर्यावरणप्रेमींच्या सहभागाअभावी वादग्रस्त ठरलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीची फेररचना करण्याचा निर्णय महापौरांनी घेतला असून, त्यामुळे सध्याची समिती बरखास्त करण्यात येणार आहे. समिती फेररचनेची प्रक्रिया चालू महिन्याच्या अखेरीसपर्यंत पार पडेल, अशी माहिती महापौर अॅड. यतिन वाघ यांनी दिली.दोन वर्षांपूर्वी महापौरांनी वृक्ष प्राधिकरण समितीची रचना केली. त्यानुसार नगरसेवकांमध्ये अपक्ष संजय चव्हाण, भाजपाचे प्रा. कुणाल वाघ, मनसेचे अॅड. अरविंद शेळके, राष्ट्रवादीचे संजय साबळे आणि कॉँग्रेसच्या अॅड. आकाश छाजेड यांचा समावेश आहे, तर अशासकीय सदस्यांमध्ये शिवा पालकर, राजेश पंडित, शेखर गायकवाड, संदीप भंवर, मनोज घोडके, नंदू वराडे, शेख मकसूद यांचा समावेश आहे. आयुक्त पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या या समितीत नगसेवकांपेक्षा अधिक अशासकीय सदस्य नियुक्त करता येत नाहीत, या मुद्द्यावर संजय चव्हाण यांनी आक्षेप घेतला होता; तर अशासकीय सदस्यांकडे दहा वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असल्याबद्दल सामाजिक वनीकरण विभागाकडील नोंदणीचे पुरावे नाहीत, असा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर आयुक्त संजय खंदारे यांनी अशासकीय सदस्यांना बैठकीस निमंत्रित करण्यास टाळले होते. दरम्यान, वृक्ष प्राधिकरण समितीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचे विषय मंजूर होत असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने समितीचे पूर्ण गठन करावे अशी सूचना केली होती. पुणे महापालिकेशी संबंधित एका याचिकेचा संदर्भ दिला होता. त्याचा कायदेशीर अभ्यास केल्यानंतर महापौरांनी समितीची फेररचना करण्याचा निर्णय घेतला आहे.नव्याने गठित होणाऱ्या समितीत पदसिद्ध सभापती तथा आयुक्तांशिवाय १३ सदस्य असतील. यात सात नगरसेवक, तर सहा अशासकीय सदस्य असतील. जुलैअखेर समिती गठित होईल, असे महापौर अॅड. यतिन वाघ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
इस्लामपुरात राष्ट्रवादीपुढे सेनेचे आव्हान
By admin | Published: July 12, 2014 12:17 AM