अशोक पाटील ।इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कोण? असा प्रश्न आघाडी काँग्रेससमोर होता. हा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदार जयंत पाटील यांच्याकडे दिली होती, तर इस्लामपूर मतदार संघात आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात कोण? असाही प्रश्न निर्माण झाला होता.
आगामी निवडणुकीत मात्र दोन्ही मातब्बरांचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाच आव्हान असणार आहे. यासाठी खोत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त लाभणार आहे.गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चित्र पूर्णपणे उलटे होते. खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे एकत्रित होते. त्यांना भाजपने साथ दिली होती. आता फक्त सदाभाऊ खोत हेच भाजपमध्ये राहिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही निवडणुकांची जबाबदारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर दिली आहे.
मंत्री खोत यांनी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याशी सलगी वाढवत त्यांना भाजपमध्ये आणले आहे. त्यांनाच विधानसभेची उमेदवारी देण्याविषयीही प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये त्यांना यशही मिळाल्याचे दिसते. या दोघांच्या राजकीय समीकरणामुळे महाडिक गटात अस्वस्थता आहे.भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीशी आपली मैत्री वाढविल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी भाजपसमोर आव्हान असणार आहे.
वेळ पडल्यास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाच मैदानात उतरण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी आपला संपर्क हातकणंगले लोकसभा मतदार संघात वाढविला आहे. त्याचबरोबर त्यांना विधानसभेची कसरतही पार पाडावी लागणार आहे. उमेदवार कोणीही असला तरी, मतदार संघासह संपूर्ण राज्यातील स्टार प्रचारकाची जबाबदारी मंत्री खोत यांच्यावरच असणार आहे. भविष्याचा विचार करुनच मंत्री खोत यांनी जि. प. निवडणुकीपासून मुलगा सागर खोत यांना राजकारणात सक्रिय केले आहे.
आमदार जयंत पाटील यांना नुकतेच पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही राज्याची जबाबदारी आली आहे. त्यांना स्वत:च्या मतदार संघाला जास्त वेळ देता येणार नाही, हे ओळखूनच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना मतदार संघात सक्रिय केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांतून राजकीय वारसदारांचीही रेलचेल दिसणार आहे.
पुन्हा आघाडीची मोट बांधण्याचे आव्हानइस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व विरोधक एकत्रित होते. परंतु आता या आघाडीत बिघाडी होऊ लागली आहे. सख्खे चुलत भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत, तर महाडिक गटानेही आपला सवतासुभा मांडत आगामी विधानसभा निवडणूक सोडायची नाही, असा पवित्रा घेतला आहे. यामुळे या विस्कटत चाललेल्या आघाडीची मोट पुन्हा बांधण्यासाठी मंत्री खोत यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.