शिराळा : चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांना मुबलक खाद्य उपलब्ध होण्यासाठी उद्यानात ब्रेडिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. तसेच शिराळा भुईकोट किल्ल्यावर संभाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न अजित पवार यांना भेटून मार्गी लावू, असे आश्वासनही पाटील यांनी यावेळी दिले.
नाटोली (ता. शिराळा) येथील शतकमहोत्सवी संस्था असलेल्या नाटोली सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व ६४.५५ लाख रुपये किमतीच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या पायाभरणीप्रसंगी पाटील बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते.
पाटील म्हणाले, बिबट्यांना आतच पुरेसे अन्न मिळाले, तर ते बाहेर मानवी वस्तीत येणार नाहीत. या सेंटरसाठी डीपीसीसीतून निधी देण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे प्राण्यांची व पर्यटकांची संख्या वाढेल. भुईकोट किल्ल्यावर संभाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न अजित पवार यांना भेटून मार्गी लावू. चांदोलीत पर्यटनाच्या वाढीसाठी सर्वतोपरी मदत करू. यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना आपल्या भागात आणून पर्यटन सुविधा वाढविण्याचा प्रयत्न करू.
आमदार नाईक म्हणाले, नाटोली सेवा सोसायटीचे काम आदर्शवत आहे.
प्रारंभी नाटोलीचे सुपुत्र व श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार मिळाल्याबद्दल पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार केला.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, बाळासाहेब पाटील, विजयराव नलवडे, जिल्हा परिषद सदस्या अश्विनीताई नाईक, वैशालीताई माने, माजी सभापती सम्राटसिंह नाईक, भूषण नाईक, सहायक निबंधक डी. एस. खताळ, नंदाताई पाटील, अनिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, सरपंच उषाताई पाटील, उपसरपंच काशिनाथ पाटील, सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कापूरकर, उपाध्यक्ष संभाजी पाटील, आनंदराव चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय लोहार यांनी केले.
फाेटाे : १७ शिराळा १
शिराळा : नाटोली (ता. शिराळा) येथील नाटोली सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक उपस्थित हाेते.