सांगली : पोलीस मुख्यालयाच्या आवारातील चंदन चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. याप्रकरणी अभिमन्यू आनंद चंदनवाले (वय ३२, रा. मालगाव रोड, मिरज) व रमेश भीमराव चंदनवाले (वय ३६, रा. मंगळपेठ, मिरज) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून चार हजार रुपये किमतीचे तीन किलो चंदन जप्त करण्यात आले.पोलीस मुख्यालयाच्या आवारात चंदनाची अनेक झाडे आहेत. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी मुख्यालयातील ट्रॅफिक पार्कमध्ये प्रवेश करून चंदनाची झाडे कापली व त्याचा बुंधा चोरून नेला होता. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी या चोरीचा छडा लावण्याचे आदेश निरीक्षक अजय सिंदकर यांना दिले होते. त्यानुसार सिंदकर यांनी पथक नियुक्त केले होते.विश्रामबागचे सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, प्रशांत निशाणदार चंदन चोरीच्या अनुषंगाने माहिती घेत होते. यावेळी पथकातील संदीप पाटील, विक्रम खोत, संकेत मगदूम यांना खबऱ्यामार्फत वानलेसवाडी परिसरात दोघेजण चंदन विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने त्या परिसराकडे धाव घेत अभिमन्यू व रमेश चंदनवाले या दोघांना ताब्यात घेतले. एका संशयिताकडील पिशवीत चार हजार रुपये किमतीचे तीन किलो १८ ग्रॅम चंदन मिळून आले. याबाबत विचारणा करता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी मुख्यालयातून चंदन चोरी केल्याचे कबूल केले. या दोघांना अधिक तपासासाठी विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या कारवाईत सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, मेघराज रूपनर, नीलेश कदम, जितेंद्र जाधव, संदीप पाटील, संकेत मगदूम, विक्रम खोत, राहुल जाधव, संजय कांबळे, शिवाजी ठोकळ, विनायक सुतार, सुनील जाधव, आदिनाथ माने, संदीप गस्ते, दरिबा बंडगर यांनी भाग घेतला.
Crime News: सांगली पोलीस मुख्यालयातील चोरीचा छडा, चंदनवालेंनीच चोरले चंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 4:20 PM