गंगाराम पाटील ।वारणावती : शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील डोंगर-दऱ्यातून काही विकृत माणसे आगी लावण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे शित्तूर, उदगिरी, चांदोली धरण व अभयारण्याशेजारील डोंगर-दऱ्यातील झाडा-झुडपांसह अनेक जीवजंतू आगीत भस्मसात होत आहेत. हिरव्यागर्द वनराईने नटलेले डोंगर आता काळे ठिक्कर पडले आहेत. चांदोली अभयारण्य प्रशासनाने व वन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे अशा विकृती फोफावत आहेत. त्याला आळा घालणे गरजेचे आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात व कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील डोंगर-दºयातून आरळा येथून उदगिरीला जाणारा रस्ता आहे. देवीचे दर्शन घेऊन येताना व जाताना डोंगर-दºयातून गवताला आगी लावण्याचे काम काही विकृत माणसे करीत आहेत. एकदा आग लागली की आग आटोक्यात येत नाही. आगीमुळे अनेक जीवजंतू आगीत भस्मसात होत आहेत. पशु-पक्षी सैरावैरा धावायला लागतात. पण आग त्यांचा पाठलाग सोडत नाही. कित्येक जीव होरपळून जातात. शिवाय आगीमुळे चांदोली अभयारण्याशेजारील मणदूर, मिरुखेवाडी, गुढे पाचगणी, जाधववाडी, खुंदलापूर या परिसरातील डोंगर-दºयातील हिरवाईने नटलेला निसर्ग काळा ठिक्कर पडला आहे. सरपटणारे जीव, दुर्मिळ वनौषधी नामशेष होत आहेत. त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
चांदोली अभयारण्य प्रशासनाला कोट्यवधी रूपयांचा निधी मिळतो; पण आगप्रतिबंधक उपाययोजनेवर काहीच निधी खर्च केला नसल्याने व ठोस उपाययोजना केल्या नसल्याने आगीवर नियंत्रण आणणे शक्य झालेले नाही. यासाठी कडक उपाययोजना करावी. आग लावल्यानंतर ती नियंत्रित होत नाही. आग लागू नये म्हणून दक्षता घ्यावी व आगी लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी लोकांची मागणी आहे. अशा घटना रोखण्यासाठी आता विशेष पथकाची स्थापना करण्याचा पर्यायही आहे. त्याचा प्रशासनाच्या पातळीवर विचार केला जावा. अगीच्या या घटनांमुळे वनांचे न भरून निघणारे नुकसान होत आहे, याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे.
आग आटोक्यात आणण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर यांनी ५ ब्लोअर यंत्रे दिली आहेत. त्यामुळे आगीवर नियंत्रण आणणे शक्य होत आहे. एक यंत्र १० ते १२ लोकांचे काम करते. पण त्याचा फायदा अभयारण्याशेजारच्या डोंगर-दºयातून लागलेल्या आगी आटोक्यात आणण्यासाठी केला जात नाही.वृक्षारोपणावर भर : संवर्धनाचे काय?एकीकडे शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून झाडे लावत आहे. पण त्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. अशा डोंगराला लागलेल्या आगीत झाडेझुडपे जळून खाक होत आहेत. अभयारण्य प्रशासन, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग यांनी एकत्रितपणे प्रबोधन करावे व आगीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. चांदोली अभयारण्य क्षेत्रातील वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी आता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रसंगी आग लावणाºयांवर कारवाई करण्याचीही भूमिका घेतली पाहिजे. त्यासाठी असे कृत्य करणारे वन विभागाच्या जाळ्यात सापडावेत म्हणून स्थानिक नागरिकांनीही प्रयत्न करण्याची गरज आहे. सामूहिक प्रयत्नातूनच आगीच्या घटना नियंत्रणात येऊ शकतील.
चांदोली धरण आणि अभयारण्याशेजारील डोंगर-दऱ्यांमध्ये आग लागून वनस्पती व वन्यजीवांना धोका निर्माण होत आहे.